नसरापूर : खेड शिवापूर येथील टोल प्लाझावर दुचाकीचालकांना जाण्यासाठी असणारी लेन अरुंद असल्याने अंदाज न आल्याने येथील दुभाजकाला धडकून दुचाकीचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याकडे टोल प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.पुणे-सातारा महामार्गासारख्या नेहमी गर्दीच्या ठिकाणी जुन्या टोल प्लाझावर एका कोपऱ्यापर्यंत उताराच्या व घसरड्या रस्त्यावर नेहमी अपघात होत आहेत. त्यात ही लेन अरुंद असल्याने दुचाकीचालकाला ती पार करणे म्हणजे दिव्यच. जीव मुठीत धरूनच ही लेन पार करावी लागते. एका वेळी अनेक दुचाकी आल्या तर मात्र या लेनवर कोंडी होऊन दुचाकी एकमेकाला धडकतात. या जुन्या टोलवर आता फक्त पुण्याकडे जाणाऱ्या ३ ते ४ लेनवर गाड्या असतात. उर्वरित लेनमधील एखादी कडेची लेन जर दुचाकीचालकांना उपलब्ध करून रोज होणाऱ्या त्रासातून दुचाकीचालक मुक्त होतील, असे दुचाकीचालकांना वाटते.वाहतूककोंडी दूर व्हावी, म्हणून टोल प्रशासनाने सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहनांकरिता नवीन टोल प्लाझा शिवराय मंगल कार्यालयालगत उभारला आहे. या नवीन टोलनाक्यावरही दुचाकीचालकांना अपघाताला निमंत्रण देण्यासाठीच की काय, दुचाकीची लेन केली की काय, असे वाटू लागले आहे. या लेनचे काम अपूर्ण असूनही या ठिकाणी काम चालू असलेल्या रस्त्यातून संरक्षित कठडे उभारून अडचणीचा रस्ता दुचाकीला करून दिला आहे. या नवीन दुचाकी लेनवर अपूर्ण रस्त्याच्या डाव्या बाजूस खोल खड्डा असूनही याच भागातून वाहनचालकांना जाण्यासाठी रस्ता करून दिला आहे. मात्र, या नवीन रस्त्यावरून जाताना दुचाकीचालक आपला जीव टांगणीला ठेवूनच रस्ता पार करीत असतात. खेड-शिवापूर टोल प्लाझाचे जनरल व्यवस्थापक रंजन बोस यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी सातारा बाजूकडे जाणाऱ्या टोलचे काम लवकरच पूर्ण करणार असून जुन्या टोलवरील कोपऱ्यातील दुचाकी रस्ता बंद करून टोलमधील एक लेन लवकरच दुचाकीसाठी उपलब्ध करून देऊ, असे सूचित करून टोलवरील अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
टोलनाक्यावरील दुचाकी लेनमुळे अपघातात वाढ
By admin | Published: January 23, 2017 2:22 AM