चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डात मागील काही दिवसांपासून नव्या कांद्याची आवक काही प्रमाणात वाढू लागली होती. मात्र, तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शनिवारी (दि. ९) ही आवक कमी होऊन फक्त अडीचशे क्विंटल कांद्याची आवक बाजारात झाली. परंतु आवक कमी झाल्याने बाजारभावात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
चाकण मार्केट यार्डात नवीन कांद्याचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास काही दिवसांपासून सुरुवात झाली होती. परंतु, तीन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे फक्त पाच हजार पिशव्यांची म्हणजे २ हजार ५०० क्विंटलचीच आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत शनिवारी जवळपास साडे तीन हजार क्विंटल कांद्याची कमी आवक झाली. परंतु कांद्याला प्रति क्विंटलला ३५०० ते २५०० रुपये भाव मिळाला. कांद्याची निर्यातबंदी हटल्याने बाजारभाव टिकून असल्याची माहिती सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
निर्यातबंदी हटल्याने परदेशात कांदा निर्यात होणार आहे. यामुळे देशातील महत्वाच्या बाजारपेठेत कांद्याचे भाव टिकून राहिले आहेत. जिल्ह्यातील चाकण व नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठ निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. चाकण येथील कांदा आखाती देश, श्रीलंका, दुबई, थायलंड,मलेशिया व सिंगापूर आदी देशात निर्यात होतो. चाकण बाजरातील कांदा निर्यातक्षम व टिकाऊ असल्याने याला मोठी मागणी असते. चाकण बाजारात निर्यातदार कंपन्या व व्यापारी काही टनांत कांदा खरेदी करून त्याची प्रतवारी व पॅकिंग करून परदेशात निर्यात करतात. कांदा टिकाऊ असल्याने अनेक मोठ्या कंपन्या व व्यापारी कांदा खरेदीसाठी चाकण बाजारात येत असतात. यामुळे कांद्याची मागणी वाढली जाते. त्यामुळे बाजारभाव टिकून राहिल्याने त्याचा फायदा शेतकरी व व्यापाऱ्यांना होतो आहे.
चौकट
नवीन कांद्याची आवक मागील काही दिवसांपासून सुरू झाली आहे. मात्र, तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना कांदा काढणी केली नाही. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. सध्या बाजारात विक्रीसाठी येणारा कांदा निर्यातक्षम नसल्याने निर्यातदार कंपन्या व व्यापारी अजून खरेदीसाठी आले नाही. परंतु पुणे, मुंबई व दिल्ली या मोठ्या शहरांमधील व्यापारी हा कांदा खरेदी करत आहेत. निर्यातबंदी उठल्याने बाजारभाव टिकून राहील्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. - विनायक घुमटकर, सभापती, बाजार समिती.