ओझर : ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ अशा जीवघेण्या प्रसंगातून एका तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगावधानता बाळगल्यामुळे कोल्हापूर डेपोच्या नाशिक-कोल्हापूर या शिवशाही गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवून मोठा अपघात टाळला. अशोक जंगम असे या तरुणाचे नाव असून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.कोल्हापूर डेपोची नाशिक-कोल्हापूर ही (एमएच- ०९- एट-१८७६) गाडी गुरुवारी (दि. ३१) सकाळी ६ वाजता नाशिकहून कोल्हापूरला जाण्यासाठी निघाली होती. ही बस नारायणगावच्या पुढे आलेली असताना जुन्नर येथील आलोक जंगम या तरुणाला शिवशाही बसच्या मागील डाव्या बाजूच्या चाकाचे बोल्ट निखळलेले दिसले. आलोकने गंभीर अपघाताचा धोका ओळखून सतर्कता बाळगत चालकाला या गोष्टीची कल्पना देण्यासाठी शिवशाहीचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, शिवशाहीच्या चाकाचे आणखी तीन नटबोल्ट निघाले. भरधाव असलेल्या या शिवशाहीला अखेर एकलहेरे गावाजवळ जीव धोक्यात घालून त्याने थांबविले. तोपर्यंत चाकाचे सहा बोल्ट पूर्णपणे निखळले होते. चालक, वाहक व प्रवासी यांनी गाडीच्या खाली उतरून मागील चाकाची वस्तुस्थिती पाहिल्यावर अक्षरश: त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. एका भयानक अपघातातून आलोक या तरुणाने आपल्याला वाचविले, तो देवदूताच्या रूपात धावून आला असल्याच्या भावना त्यांनी व गाडीतील प्रवाशांनी व्यक्त केली. या वेळी गाडीमधे १७ प्रवासी होते.आमचे नशीब बलवत्तर म्हणून आम्ही सर्व जीवघेण्या अपघातातून वाचलो. गाडी अजून काही मीटर जरी पुढे धावली असती, तर गाडीचे चाक पूर्ण निखळून भीषण अपघात झाला असता. चाकाचे फक्त तीन बोल्ट राहिले होते. चालक एस. आर. भोसले यांनी नाशिकहून गाडी निघताना चारही चाके सुस्थितित असल्याची खात्री केली होती.-ए. जे. चौगुले, शिवशाहीचे वाहकशिवशाहीची पाठलाग करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. कारण, सकाळी ९ च्या दरम्यान पुणे-नाशिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. मी रस्त्यावर कसरत करून गाडीचा पाठलाग केला. जीव धोक्यात घातला, परंतु शिवशाहीला मोठ्या अपघातातून वाचविल्याचे समाधान आहे.- आलोक जंगम
त्यानं दाखवलं प्रसंगावधान; वाचवले प्रवाशांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 2:50 AM