पुणे : पोलीस आयुक्तालयाकडून २१४ रिक्त पदासाठी घेण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्यावेळी दोन ठिकाणी डमी उमेदवार बसविण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ७ जणांविरुद्ध ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला आहे. परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांकडून फोटो व व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत होते. तसेच, हॉल तिकीटावरील फोटो व प्रत्यक्ष फोटो अशी तपासणी केली जात होती.
सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स येथे योगेश कौतिकराव गवळी या तरुणाच्या जागेवर बाळासाहेब भीमराव गवळी (रा. धावडा, भोकरदन, जानला) हा परीक्षा देताना आढळून आला. तसेच, या तरुणाला परीक्षा देण्यासाठी मदत करणाऱ्या सूरज भोपळावत (रा. सांजखेडा, औरंगाबाद) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी प्राचार्य मगन प्रल्हाद घाटुळे यांनी फिर्याद दिली आहे.
सिंहगड इन्स्टिट्यूट मॅनेजमेन्ट ॲन्ड कंम्प्युटर ॲप्लिकेशन या केंद्रावर महेश सुधाकर दांडगे (रा. भराज खुर्द, जाफराबाद, जालना) या उमेदवाराच्या जागेवर विठ्ठल किसन जारवाल (रा. पिंपळगाव, औरंगाबाद) याला पकडण्यात आले. यावेळी अन्य एका व्यक्तीने यासाठी मदत केल्याचे आढळून आले आहे. तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जारवाल याने दांडगे याच्याकडून ५ लाख रुपये परिक्षेला बसण्यासाठी घेण्याची बोली केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
रामेश्वर गवळी (वय २३, रा. सांजखेड, ता.पैठण. जि. औरंगाबाद) हा शामराव भोंडणे याच्या जागी परिक्षेला बसला असल्याचे आढळून आले. इतर ठिकाणीही आरोपी अशाप्रकारे लेखी परिक्षेच्यावेळी डमी म्हणून बसले आहेत का याचा देखील पोलिस तपास करत आहेत.
पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या २१४ पोलिस शिपाई पदासाठी २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आली होती. यासाठी ३८ हजार ४४१ उमेदवारांनी अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांची लेखी परिक्षा मंगळवारी ७९ केंद्रावर पार पडली. यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १२ हजार २७ विद्यार्थींनी आज लेखी परिक्षा दिली. या उमेदवारांपैकी एकास दहा प्रमाणे साधारण २२०० जणांची मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली २ अप्पर पोलीस आयुक्त, १४ सहायक पोलीस आयुक्त, ७० पोलीस निरीक्षक, १४७ सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, २ हजार ३८५ पोलीस अंमलदार असा बंदोबस्त लावला होता. परिक्षेला येणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शनासाठी बसस्टॅंड, रेल्वे स्थानकावर पोलीस तैनात केले होते. बऱ्याच परिक्षा केंद्रांवर उमेदवारांना पाणी व फळे पुरविण्याची जबाबदारी पोलिसांनी पार पाडली.