पुणे : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या खराडी येथील एका स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली. यावेळी पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरच्या मॅनेजरविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवशंकर राजेंद्र थोरात (२४, रा. दर्गा रोड, खराडी, मूळ रा. लातूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मॅनेजरचे नाव आहे. याबाबत महिला पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्फिनिटी थाई स्पा, शॉप क्रमांक २, दुसरा मजला, सीटी व्हिस्टा, ए बिल्डिंग, दर्गा रोड, खराडी येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली असता, तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने गुरुवारी (दि. ४) सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी आरोपी थोरात हा पीडित तरुणींना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी थोरात आणि त्याचा साथीदार विकास प्रजापती याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.
पोलिसांनी स्पा सेंटरमधून मोबाइल व इतर साहित्य असे ३३ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, कर्मचारी मनीषा पुकाळे, तुषार भिवरकर, अजय राणे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार यांच्या पथकाने केली.