आव्हाळवाडी :वाघोली-भावडी रस्त्यावर मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भरधाव येणाऱ्या डम्परने मारुती कारला जोरदार धडक दिल्यामुळे कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे. एअरबॅगमुळे गाडीमध्ये असणारे दोघे बालंबाल बचावाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
वाघोली-भावडी रस्त्यावर मंगळवारी (३० मार्च) दुपारी १ वाजेच्या सुमारास वाघोलीकडून भावडीकडे जाणाऱ्या डंपरने ब्रेक न लागल्यामुळे वाघोलीकडे येणाऱ्या मारुती कारला जोरदार धडक दिली. धडक जोराची असल्यामुळे कारचा समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. एअरबॅग उघडल्यामुळे कारमध्ये असलेले दोघेजण बालंबाल बचावले. भावडी रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरु असून अनेकांना जीवही गमवावा लागला आहे..क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी उपसरपंच कविता दळवी यांनी केली आहे.
महसूल, परिवहन अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे जड वाहतूकदारांकडून सर्रास नियामंचे उल्लंघन केले जात आहे. भावडी रस्त्यावर अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावा लागला. संबधित अधिकाऱ्यांना वारंवार कारवाईची मागणी करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. - सुधीर दळवी (सामिजिक कार्यकर्ता)
भावडी रस्त्यावर भरधाव येणाऱ्या डम्परने धडक दिल्यानंतर चक्काचूर झालेला कारचा समोरचा भाग