लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : विठू नामाचा गजर... भगव्या पताका... तसेच आषाढी सोहळ्यानिमित्त शहरात दाखल झालेल्या हजारो वारकरी भक्तांमुळे संपूर्ण दौंडनगरी भक्तिमय वातावरणात न्हाहून निघाली. भीमेच्या पात्रात स्नान करून आषाढी एकादशीनिमित्त राही रुक्मिणीचे दर्शन घेतले. तर डॉ. हेडगेवार स्मृती समितीच्या वतीने परंपरेनुसार घेण्यात आलेल्या शालेय दिंडीत स्पर्धांमुळे शहरात एक आगळेवेगळे धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. ठिकठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या ध्वनीफिती टाळमुदंग आणि ज्ञानोबा तुकाराम माऊली या जयघोषाने अवघा परिसर भक्तीमय झाला होता. वारकरीदेखील पालखी सोहळ्यात बेफाम नाचत होते. विठ्ठल मंदिराच्या परिसरात सुशोभीत रांगोळ्या काढून तोरण पताका लावण्यात आल्या होत्या. पहाटे अॅड. सुधीर गटणे आणि परिवाराच्या वतीने विठ्ठल मंदिरात पौराहित्य करण्यात आले. पहाटेपासूनच भाविकांच्या विठ्ठल दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. येथील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ प्रथेप्रमाणे पंचक्रोशीतील १४ ग्रामदैवतांच्या पालख्यांचे आगमन झाले. या वेळी गावचे पाटील तथा माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील, इंद्रजित जगदाळे पाटील यांनी स्वागत केले तर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीजळ नगराध्यक्षा शीतल कटारिया यांनी पालखींचे स्वागत केले. अग्रभागी मानाची कुरकुंभ येथील फिरंगाई देवीची पालखी होती. त्यानंतर भैरवनाथ (गिरीम), म्हस्कोबा (गोपाळवाडी), भैरवनाथ (जिरेगाव), भैरवनाथ (मळद), म्हसोबा (माळवाडी), म्हसनोबा (म्हसनेरवाडी), बिरोबा (येडेवाडी), सिरसाई (शिर्सुफळ), भैरवनाथ (पांढरेवाडी), भैरवनाथ (मेरगळवाडी), भैरवनाथ (वाघदरा), भैरवनाथ (कौठडी), भोळाबा (भोळाबावाडी). या पालख्यांचे वाजत गाजत सकाळी ११ वाजता दौंडनगरीत आगमन झाले. शहरातील मुख्य रस्त्यावर सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी पालख्यांचे स्वागत करून अल्पोहार तसेच पाणीवाटप केले. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. मजलदरमजल करीत १४ ग्रामदैवतांच्या पालख्या भीमा नदीवर देवांना स्नान घालण्यासाठी आल्या. सर्वप्रथम ग्रामदैवतांच्या आरत्या झाल्या. त्यानंतर ग्रामदैवतांनाभीमेचे पात्र स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यानंतर गाववेशीतून या पालख्या विठ्ठल मंदिराच्या पसिरात विसाव्याला गेल्या. याठिकाणी रामेश्वर मंत्री आणि मंत्री परिवाराच्या वतीने भव्य मंडप परंपरेनुसार वारकऱ्यांसाठी उभारला होता. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक : शालेय दिंडी स्पर्धेचा निकाल ४दौंड शहरात पंचक्रोशीतील १४ ग्रामदैवतांच्या दिंड्या आल्यानंतर येथील गांधी चौकात मुस्लिम बांधवांनी वारकरी भक्तांना अल्पोहार आणि फराळाचे वाटप केले. मुस्लिम बांधवांकडून वारकरी भक्तांना अल्पोहारासाठी होणाऱ्या आग्रहामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पंरपरेनुसार होते. डॉ. हेडगेवार स्मृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिणोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरेनुसार चार गटात शालेय दिंडी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. शहरातील मुख्य रस्त्यावरुन सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक प्रबोधन करीत या शालेय दिंड्यांमुळे दौंड नगरी गजबजली होती. दिंडी स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे...लहान गट : गीताबाई बंब शाळा (प्रथम), शिशूविकास मंदिर (द्वितीय), क्रांतीज्योती सरस्वती विद्यालय (तृतीय). शिशुगट : ब्लॉसम नर्सरी (प्रथम), रत्नदीप बालकमंदिर (द्वितीय), सरस्वती बालक मंदिर (तृतीय). मध्यम गट : शिशूविकास मंदिर (प्रथम), श्रीमती शांताबाई ठोंबरे विद्यालय (द्वितीय), शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय (तृतीय), मोठा गट : विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय (प्रथम), तुकडोजी विद्यालय (द्वितीय), लाजवंती गॅरेला (तृतीय).
विठूनामाच्या गजराने दुमदुमली दौंडनगरी
By admin | Published: July 05, 2017 2:49 AM