पुणे : बस प्रवासादरम्यान महिलांची नजर चुकवून त्यांच्या पर्समधील दागिने, तसेच हातातील पाटल्या, बांगड्या कट करून चोरून नेण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रविवारी एकाच दिवसात पीएमपी बस प्रवासादरम्यान दोन महिलांचे ५ लाख ३० हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
पहिली घटना कात्रज ते वाकडेवाडीदरम्यान रविवारी दुपारी सव्वातीन ते सव्वाचारदरम्यान घडली. याप्रकरणी औरंगाबाद येथील ५२ वर्षांच्या महिलेने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या महिला कात्रज येथून वाकडेवाडीपर्यंत बसने प्रवास करीत होत्या. चोरट्याने प्रवासादरम्यान त्यांचे पर्समध्ये ठेवलेले ३ लाख ८० हजार रुपयांचे ९ तोळे वजनाचे मंगळसूत्र व बांगड्या लंपास केल्या. या महिला वाकडेवाडी येथे बसमधून उतरल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
दुसरी घटना रविवारी दुपारी पावणेचार ते चार वाजेदरम्यान मांगीरबाबा चौक ते दांडेकर पूलदरम्यान पीएमपी बस प्रवासात घडली. याप्रकरणी भोसरीतील गव्हाणे वस्ती येथे राहणाऱ्या ५९ वर्षांच्या महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या मांगीरबाबा चौक ते दांडेकर पूल असा पीएमपीएल बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या हातातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची पाटली कापून चोरून नेली.