पुणे : कोरोना संक्रमणाच्या काळात लहान मुलांच्या लसीकरणात ४० टक्क्यांनी घट झाल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. आरोग्य यंत्रणा कोरोनाशी दोन हात करत असताना झटत असताना इतर आजार, शस्त्रक्रिया, उपचार लांबणीवर पडले. याचाच परिणाम लहान मुलांच्या लसीकरणावर झाला आहे. लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडल्यास कोरोना संसर्ग होईल, या भीतीने पालकांनी लसीकरणच लांबणीवर टाकले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील लसीकरण जास्त प्रमाणात घटल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळाले.
लसीकरण हा बालकांच्या संगोपनातील महत्त्वाचा घटक आहे. पोलिओ, क्षयरोग, गोवर, कांजिण्या अशा विविध आजारांपासून लहान मुलांचे संरक्षण व्हावे आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, यादृष्टीने लसीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, कोरोना काळात कोरोनामुळे लसीकरण मोहीम रखडली आहे. लस न मिळाल्याने तब्बल ८ कोटी मुलांचा जीव धोक्यात असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केली आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिभा भोसले म्हणाल्या, ‘कोरोना साथीमुळे अर्धवट लसीकरण झालेल्या किंवा अजिबात लसीकरण न झालेल्या मुलांचे प्रमाण ५०-६० टक्के इतके आहे. पाच वर्षांखालील मुलांचे नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार होणे अत्यंत आवश्यक आहे. जानेवारी महिन्यापासून लसीकरण पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे.’
-----
जन्मजात बालके - बी.सी.जी, कावीळ आणि पोलिओ
दीड महिन्यानंतर - ट्रिपल, हिब, हिपाटाईटिस बी, रोटा, न्यूमोनिया
त्यानंतर २८ दिवसांनी - ट्रिपल, पोलिओ, हिब, रोटा, न्यूमोनिया
त्यानंतर पुन्हा २८ दिवसांनी - ट्रिपल, पोलिओ, हिब, रोटा, न्यूमोनिया
सहा महिने - इनफ्लुएन्झा प्रतिबंधक लसीची दोन इंजेक्शन्स (महिन्याच्या अंतराने)
नऊ महिन्यांनंतर - एमएमआर
पंधरा महिन्यांनंतर - कांजिण्या
१५ ते १८ महिन्यांनंतर - बूस्टर, कांजिण्या दुसरा डोस
१६ महिन्यांनंतर २४ महिन्यांपर्यंत - पहिला बुस्टर
पाच वर्षे - दुसरा बुस्टर
---
पोलिओ आणि गोवरसारखे आजार आजवर अथक प्रयत्न करून आटोक्यात आले. नियमित लसीकरणात ढिसाळपणा झाल्यास या आजारांचे प्रमाण वाढण्यास वेळ लागणार नाही. इनफ्लुएनझा, गोवर, न्यूमोनिया हे आजार देखील श्वसन संस्थेवर परिणाम करतात. कोरोना बाधित रुग्णाला असे आजार झाल्यास गुंतागुंत वाढते. लसीकरण कमी झाल्यास संसर्गजन्य आजार बळावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या लसीकरणात दिरंगाई करू नये.
- डॉ. प्रमोद जोग, भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष
---
एप्रिल २०१९-मार्च २०२० एप्रिल २०२०-जानेवारी २०२१
पुणे शहर ५६६७५ ३९२५८
ग्रामीण ६५०१२ ४७४४०
---
कोरोना काळातही ग्रामीण भागात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी करण्यात आला आहे. ज्या बालकांचे लसीकरण झाले नसेल, ते पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी आरोग्य विभागातर्फे नियोजन सुरू आहे.
- भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी