पुणे: मागील दीड वर्षातील कोरोनाकाळात अनेकांनी त्यांची जवळची माणसे गमावली आहेत. जिल्ह्यात 1 हजार 920 मुलांना एक किंवा दोन्हीही पालकांना गमवावे लागले आहे. ही माहिती पुणे जिल्हा कोव्हिड टास्क फोर्सच्या नवीन आकडेवरून समोर आली आहे. कोरोनाकाळात वडील पालक गमावलेल्या मुलांची संख्या 1 हजार 621 आहे. तर 237 मुलांनी त्यांची आई गमावली आहे. 62 मुलांनी त्यांचे दोन्हीही पालक गमावली आहेत.
वयोगटानुसार आकडेवारी पाहिली तर, 11 ते 14 वयोगटात असणाऱ्या 566 मुलांच्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे. 6 ते 10 वयोगटातील 518 मुलं पोरकी झाली आहेत. 15 ते 18 वयोगटातील 493 मुलांनी पालक गमावले आहेत. तर सहा वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या 335 चिमुकल्यांचे छत्र हरवले आहे. 19 ते 23 वयोगटातील 9 तरुणांनी कोरोनाकाळात एक किंवा दोन्हीही पालक गमावली आहेत.
बालशौर्य: तेरा वर्षांच्या आयुषने दिले दोघांना ‘आयुष्य’
महिला आणि बालकल्याण विभागाच्या सुरवातीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 2 हजार 218 मुलांच्या एक किंवा दोन्हीही पालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. यापूर्वी काही नावे दोनदा नोंदणी झाली होती त्यामुळे हा आकडा जास्त होता. तसेच ती माहिती अपुरी होती. आता त्यात सुधारणा केली असून पुणे शहरातील 737, पिंपरी चिंचवडमधील 365 आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 748 मुलांना कोरोनाकाळात त्यांच्या एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित मुले जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या भागातील आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.