पुणे : कोरोना काळात वाढलेला कामाचा व्याप, त्यामुळे होणारी धावपळ यामुळे डॉक्टरांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. शारीरिक आणि मानसिक ताणामुळे पहिल्या लाटेत अनेक डॉक्टरांचे वजनही घटले. कामाला प्राधान्य देत डॉक्टरांनी जमेल त्याप्रमाणे आहार आणि व्यायामाचे सूत्र पाळण्याचा प्रयत्न केला आहे. व्यस्त आणि तणावपूर्ण वेळापत्रकाची सवय झाली असून, रुग्णसेवेला प्राधान्य देण्याकडे डॉक्टरांचा कल आहे.
आरोग्य यंत्रणा गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाच्या आजाराशी दोन हात करत आहेत. डॉक्टर या लढाईत अग्रभागी आहेत. पहिल्या लाटेमध्ये संपूर्ण यंत्रणेसाठी हे संकट नवीन होते. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी दिवसरात्र कष्ट घेतले. दुसऱ्या लाटेच्या उद्रेकातही ते अहोरात्र काम करत आहेत. कामाच्या अनिश्चित वेळा, सततचा ताणतणाव, रुग्णसेवा करत असतानाच स्वतःची आणि कुटुंबाची काळजी, प्रशासकीय जबाबदाऱ्या अशा अनेक ताणांचा त्यांनी सामना केला आहे. आहार, व्यायामाची सूत्रे पाळण्याचा शक्य तितका प्रयत्न डॉक्टर करत आहेत.
-------
कामाचा ताण थोडा कमी झाल्यावर घरच्या घरी व्यायाम करायला वेळ मिळतो आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात कोणत्याच डॉक्टरांकडे स्वतःसाठी वेळ नव्हता. सकस आहार आणि जीवनसत्त्वे यावर जास्तीत जास्त भर दिला. झोप पुरेशी होऊ शकत नाही, आहाराच्या वेळाही पाळल्या जात नाहीत. मात्र, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण टळणार नाही, यावर भर असतो. पहिल्या लाटेत कामाचा ताण जास्त होता. वजनही चार-पाच किलो कमी झाले होते. मात्र, सप्लिमेंटरी गोळ्या नियमितपणे घेतल्या. मानसिक आरोग्य जपण्यासाठी दररोज सकाळी किमान १० मिनिटे प्राणायाम करण्यावर भर असतो.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
------
पहिल्या लाटेत डॉक्टरांवर जास्त ताण होता. त्या काळात जवळपास ७-८ किलो वजन कमी झाले होते. लाटेचा उद्रेक सुरू असताना जेवणाच्या वेळा पाळणे शक्य नव्हते. शांतपणे काम करायचे, मन खंबीर ठेवायचे हेच मानसिक शांतीसाठी गरजेचे आहे.
- डॉ. रोहिदास बोरसे, प्रमुख, अतिदक्षता विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय