नारायणगाव : लाला बँकेने कोरोनाच्या काळातही ठेवी व कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली असून सरकारी रोखे विक्रीतून ४ कोटी ५० लाख नफा मिळविलेला आहे . सभासदांसाठी २ लाखांचा अपघाती विमा काढलेला असून सभासदाचा रस्त्यावर अपघात झाल्यास ५० हजारांचा विमा लाभ देणारी एकमेव लाला बँक आहे, असे उद्गार लाला अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष ॲड. निवृत्ती काळे यांनी काढले.
लाला बँकेची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ४६ वी वार्षिक सर्वसाधारण जयहिंद शैक्षणिक संकुल कुरण येथे संपन्न झाली. या वेळी अध्यक्ष ॲड. निवृत्ती काळे, उपाध्यक्ष नितीन लोणारी, संचालक मनसुख भंडारी, अशोक गांधी, जगदीश फुलसुंदर, विमल थोरात, सुनीता साकोरे, सचिन कांकरिया, जैन्नुददीन मुल्ला, नारायण गाढवे, डॉ. सचिन कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावळकर, उपमुख्य कार्यकारी प्रदिप मोरे आदी उपस्थित होते.
ऑनलाइन सभेत सभासदांनी सहभाग दर्शवून सर्व विषयांना एकमताने मान्यता दिली. सभेत सभासदांनी व्यवस्थापकीय मंडळ स्थापन करणे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणुकीसाठी मान्यता, एकरकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत दिलेल्या कर्जाच्या सूट यांसह अन्य विषयांना मान्यता दिली. त्याचप्रमाणे बाजारपेठ शाखेच्या नियोजित नविन बांधकाम इमारतीसाठी मान्यता देण्यात आली . तसेच कर्ज व्याजदर कमी करावेत, अशी सूचना सभासदांनी केली.
बँकेचे उपाध्यक्ष नितीन लोणारी यांनी आर्थिक वर्षात दिवंगत झालेले बँकेचे ज्येष्ठ संचालक स्व. तात्यासाहेब गुंजाळ , डॉ. हिरालाल शहा , अशोक शहा , प्रल्हाद बाणखेले , काही सभासद , थोर मान्यवर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
निवृत्ती काळे यांनी अध्यक्षीय भाषणात सभासदांसाठी लाभांशकरिता ६७ लाख ३५ हजारांची तरतूद, कर्मचारी वर्गासाठी मेडिक्लेम पॉलिसी काढण्यात आली असल्याचे सांगत बँकेचे कामकाज रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शन तत्वानुसार चालू आहे, अशी माहिती देऊन सभासंदाच्या प्रश्नांचे निरसन केले.
सूत्रसंचालन शरद निसाळ व सतिश जाधव यांनी केले. बँकेचे संचालक सचिन कांकरिया यांनी आभार मानले.
११ नारायणगाव लाला बँक
लाला बँकेच्या सर्वसाधारण सभेत दीपप्रज्वलन करताना निवृत्ती काळे, नितीन लोणारी, अशोक गांधी, जगदीश फुलसुंदर, विमल थोरात व इतर.