पुणे : यंदाच्या दिवाळीत पुणेकरांनी प्रवासाचे सर्वच उच्चांक ओलांडले असून, २८ ते ३० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत धावत असणाऱ्या एसटीसह रेल्वे आणि विमान प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ यंदा दिसून आली. यामुळे आपोआपच त्यांच्या उत्पन्नातही मोठी भर पडली आहे. मोठ्या प्रमाणात पुणेकर बाहेरगावी गेल्याने पीएमटीचे उत्पन्न मात्र घटले आहे.
पुण्यात एसटी विभागातर्फे १,५०० दिवाळी विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. या दरम्यान, दररोज १ लाख ६० हजार प्रवासी एसटीने प्रवास करत होते. याचा फायदा एसटीच्या उत्पन्नावरही झाला, दिवाळीत एसटीने दररोज दीड कोटी रुपयांपर्यंतची कमाई केल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटीसह विमान प्रवासालाही मोठी गर्दी असल्याने, दिवाळीच्या दोन दिवस आधी (२१ ऑक्टोबर) एकाच दिवशी १७० विमानांनी उड्डाण केले. दररोज १२० ते १३० उड्डाणे पुणे विमानतळावरून होत असतात. एसटी, विमानसेवेपाठोपाठ रेल्वेलाही प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. इतर वेळी ८० ते ८५ हजार प्रवाशांची दररोज पुणे स्टेशनवर ये-जा असते, दिवाळीत हीच संख्या दरदिवशी सव्वा ते दीड लाखांच्या घरात गेली होती.
एसटीचे प्रवासी आणि उत्पन्न
- एसटीने इतर वेळी - सव्वालाख लोक प्रवास करतात.
- दिवाळीत - १ लाख ६० हजार प्रवासी.
- इतर वेळी रोजचे उत्पन्न - ९५ लाखांपर्यंत
- दिवाळीत रोजचे उत्पन्न - १ कोटी ५० लाखांपर्यंत.