देहूरोड - लष्करी मैदानावर कवायत सुरू असताना चक्कर येऊन एक जवान कोसळला. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. चक्कर येऊन पडलेल्या जवानाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले़ मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. चंद्रकांत चोखाजी दाभाडगे (३९, रा. इंद्रायणीदर्शन, देहूरोड मूळगाव टेंभूर्णी, वसमतनगर, परभणी) असे त्या जवानाचे नाव आहे.
देहूरोड येथील लष्कराच्या मैदानावर ७८७ एडी ब्रिगेडमधील जवानांचे त्रैमासिक संचलन व शारीरिक क्षमतेवर आधारित कवायती सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी जवानांच्या एका टीमची कवायत सुरू होती. त्या वेळी ही घटना घडली. १९९९ मध्ये लष्करात भरती झाले होते. १८ वर्षांपासून ते लष्करी सेवेत होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी सविता आणि तेजस (वय १४), राजेश (वय १३) अशी दोन मुले आहेत. परिवारासह ते इंद्रायणीदर्शन येथील लष्करी वसाहतीत राहत होते.