लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या या आठवड्यात चौथ्यांदा एक हजाराच्या आत आली असून, रविवारीही केवळ ७०९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २ हजार ३२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ रविवारी पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या १० हजारांपर्यंत आली असून, सध्या शहरात १० हजार ६७६ सक्रिय रूग्ण आहेत़ २३ एप्रिलमध्ये शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ५०, ३२५ होती आणि आज २३ मे रोजी १० हजार ६७६ वर आली आहे. त्यामुळे महिनाभरातच ४० हजार रूग्ण कमी झाले आहेत. ही दिलासादायक बाब आहे.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. तसेच मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही कमी होत आहे. दरम्यान, आज तपासणी करून घेणाऱ्यांची संख्याही १० हजारांच्या आत असून, आज दिवसभरात ९ हजार ५६ जणांनी तपासणी करून घेतली आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ७.८३ टक्के इतकी आहे़ दिवसभरात ६० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २१ जण पुण्याबाहेरील आहे. आजचा शहरातील मृत्यूदर हा १.७१ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ५ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर गंभीर रूग्ण संख्याही १ हजार २९१ इतकी आहे़ शहरात आत्तापर्यंत २४ लाख ३६ हजार ४४६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६५ हजार ६२५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ४६ हजार ९४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत शहरात ८ हजार ७ जणांचा मृत्यू झाला आहे़
-------------
पुणे शहरातील कोरोना रुग्ण
२३ एप्रिल - ५० हजार ३२५ सक्रिय रुग्ण
२३ मे - १०हजार ६७६ सक्रिय रुग्ण
----------------------