पुणे: नवरात्र व दसरा काळात सार्वजनिक आरोग्य व जनहित विचारात घेता जनतेस स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने भेसळ करणाऱ्यांवर धडक मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ७ लाख रूपये तर पुणे विभागात ३ लाख ३४ हजार रूपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला. यावरून स्पष्ट हाेते की, पुण्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा कारभार चांगलाच जोरात आहे.
सणवार आले की, भेसळीचा धंदा तेजीमध्ये येतो. त्यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र आरोग्य पणाला लावले जाते. सामान्य नागरिक बिनदिक्कतपणे गोड पदार्थ खरेदी करतात आणि सण साजरे करतात. परंतु, भेसळयुक्त पदार्थांमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, याची त्यांना कल्पना नसते.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियमन अन्वये ही कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यात अन्न आस्थापनेच्या १० तपासण्या करण्यात आल्या. अन्न आस्थापनांमधून दुध, खवा, पनीर, स्वीट मावा, तूप, बटर व नमकीन इत्यादी अन्न पदार्थांचे एकूण १९ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भेसळीच्या संशयावरून विविध अन्न पदार्थांच्या धाडी घालून जप्ती करण्यात आली. पुणे कार्यालयाने गाईचे तुप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा, वनस्पती, भगर इत्यादी अन्न पदार्थाचा एकूण ७ लाख ४६० रूपये साठा जप्त करण्यात आला.
नवरात्र-दसऱ्यात १० लाखांची कारवाई
पुणे विभागामध्ये अन्न आस्थापनेच्या २८ तपासण्या करण्यात आल्या असून, अन्न आस्थापनांमधून दुध, खवा, पनीर, स्वीट मावा, तुप, बटर व नमकीन इत्यादी अन्न पदार्थाचे एकूण १५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. संशयावरून विविध अन्न पदार्थाच्या धाडी घालून माल जप्त केला. पुणे जिल्हा व पुणे विभागात मिळून १० लाख ३५ हजार ३७८ रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
येथे करा तक्रार !
नागरिकांना भेसळीसंदर्भात काही संशय आल्यास त्यांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली.
का होते भेसळ ?
सणवार आला की, गोड-धोड खाद्यपदार्थांची मागणी वाढते. कारण सणाला गोड पदार्थांचीच सर्वत्र रेलचेल असते. परंतु, गोड पदार्थ तयार करण्यासाठी जे दुध, खवा, मावा लागतो, त्याचे उत्पादन नेहमीप्रमाणेच असते. मग अचानक सणवाराला मागणीच्या तुलनेत पुरवठा कसा होणार ? त्यामुळे मग भेसळ करून माल वाढविण्यात येतो. त्यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचे मात्र तीन-तेरा वाजतात.
भेसळ सिध्द झाल्यानंतर खटला
दसरा-नवरात्रामध्ये भेसळ करण्याचे प्रमाण अधिक असते, म्हणून आम्ही खास पथके नेमतो. ही पथके संबंधित भेसळ करणाऱ्या दुकानांवर धाडी टाकतात. तेथील माल जप्त करतात आणि तो माल आम्ही प्रयोगशाळेत पाठवतो. तिथे भेसळ सिध्द झाल्यानंतर संबंधितांवर खटला भरला जातो. - सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे
गणेशोत्सवात १४ लाखांचा माल जप्त
पुणे शहरामध्ये गणेशोत्सव काळामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शहर, तसेच जिल्ह्यात कारवाई करून १४ लाख ३५ हजार रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केले होते. या कारवाईत भेसळयुक्त तूप, बटर, पनीर, खवा, मिठाई असे खाद्यपदार्थ जप्त केले. पुणे विभागात भेसळीच्या संशयावरून १०१ विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांचे नमुने घेतले होते.