नसरापूर (पुणे) : देशात आणि परदेशात भारताचे नाव अभिमानाने घेतलं जातं. ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नसून निवडणूक विकासाची आहे. देशाची प्रगती करणारी ही निवडणूक आहे. काही लोक निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झाले. आघाडीच्या हातात संधी असताना मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, उलट मराठा समाजाला वंचित ठेवलं. महायुतीने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे दहा टक्के आरक्षण दिलं. उलट त्याच्यावर यांनी टिका केली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नसरापूर (ता.भोर) येथे तोंडसुख घेतलं.
बारामती लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ नसरापूर ( ता.भोर) येथे महायुतीची सभा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेससह उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता खोचक टीका केली. सभेच्या सुरुवातीला शिवाजी महाराज की जय! असा जयघोष शिंदे यांनी केला. सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, विजय शिवतारे, नीलम ताई गोऱ्हे, कुलदीप कोंडे, रणजीत शिवतरे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे,रमेश कोंडे, शरद ढमाले, जीवन कोंडे, बाळासाहेब चांदेरे ,अमोल पांगारे, बाळासाहेब गरुड, प्रताप शिळीमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तरीही परत मत मागायला येता...
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, भोरमधील उत्रौलीमध्ये ९३ साली एमआयडीसीचे शिक्के पडले तरी आजपर्यंत एमआयडीसी झाली नाही. यांनी तीस वर्ष काय केलं? मागच्या वेळेस खासदार म्हणल्या एमआयडीसी नाही केली तर मतं मागायला येणार नाही, असं त्या म्हणाल्या होत्या, तरीही परत मत मागायला येतात असं म्हणत अजित पवार यांनी एमआयडीसीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
तुम्ही आत्तापर्यंत ज्यांना खासदार केलं त्यांनी भोर, वेल्हा, मुळशीसाठी आत्तापर्यंत कायं केलं? भोरची लोकसंख्या का कमी होतीय ह्याचा कधी विचार केलाय का? इथं नसबंदी झालीय म्हणून लोकसंख्या कमी झालेली नाही तर रोजगार नाही म्हणून कमी झाली आहे. पर्यटनाचा विकास झाला नाही. या ठिकाणच्या राजगड कारखान्यात उसाला तेवीसशे रुपये टनाला देऊन कसं होणार? यावेळेस महायुतीच्या अनेक पक्षांनी एकत्र येऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. या ठिकाणच्या खासदारांनी कायं कामं केली ते सांगावं? नुसतं भाषण करून कायं होत? भोर - वेल्ह्याची कायं अवस्था झालीय. सत्ता असताना विकास करायला कायं झालं होतं, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.