पुणे : आर्थिक गुन्हे शाखेने २०१८ मध्ये विविध आर्थिक गैरव्यवहारात ठेवीदारांची फसवणूक केलेल्या २२ जणांना अटक केली असून त्यांची तब्बल ३ हजार ३९५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे़ त्यांच्याकडून ३ कोटी ७४ लाख ३६ हजार ५६३ रुपये जप्त करण्यात आले आहेत़
गेल्या वर्षभरात पुणे शहरात अनेक आर्थिक गैरव्यवहार होऊन ठेवीदारांची फसवणूक करण्याच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती़ यामध्ये प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध ७ हजार ९५७ ठेवीदारांनी व फ्लॅटधारकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती़ त्यात पोलिसांनी डी़ एस़ कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकणी, मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यासह ८ जणांना अटक केली आहे़ त्यांची २ हजार ९७ लाख ६७ हजार २०० रुपयांची मालमत्ता जप्त केली़ त्यांच्या २ हजार ९१ कोटी रुपयांच्या ४५९ स्थावर मालमत्तेवर टाच आणली आहे. रावत भिशी प्रकरणात संदीप वीरेंद्रसिंग रावत यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध ११५ जणांनी ८ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणुकीची तक्रार दिली आहे़ त्यांची २ कोटी १० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे़टेंपल रोज प्रकरणात २ कोटी २६ लाख ६९ हजार रुपये आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा असून एमपीआयडी न्यायालयाच्या परवानगीने गुंतवणुकदारांना लवकरच या रक्कमेचे वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी सांगितले. जास्त व्याजाचे आमिष दाखवून काही वित्तीय संस्था, भागीदारी फर्म नागरिकांना आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडतात़ आपल्या परिसरात अशा वित्तीय संस्था सुरू झाल्या असतील तर त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे द्यावी, असे आवाहन ज्योतिप्रिया सिंह यांनी केले आहे़रसिट्स चेक इन्स क्लबचे व्ही. नटराजन, प्रकाश उत्तेकर यांना अटक करून त्यांची १ हजार ३०१ कोटी ३२ लाख ६० हजार ६०० रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे़ टेंपल रोजचे वनिता देविदास सजनानी, दीपा देविदास सजनानी यांना अटक केली असून त्यांच्याकडून ७६ लाख ६९ हजार ३६३ रुपये जप्त केले आहेत़ संस्कार ग्रुपच्या ४६१ ठेवीदारांनी १५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल आहेत़ त्यांची ११ लाख रुपयांची मालमत्ता एमपीआयडी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आली आहे़ कल्याणी नागरी नागरी पतसंस्थेचे अजय गोंविद भुते यांच्याविरुद्ध ७० जणांनी तक्रारी दिल्या असून ३ कोटी ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे़ त्यांची ७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे़