--
अयाज तांबोळी : डेहणे
जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या एक वर्षाच्या कालावधीत एकट्या भोर तालुका व परिसरामध्ये (राजगुरुनगर वनविभाग हद्द) बिबट्याने तब्बल २६ पाळीव जनावरांची शिकार केली आहे. या प्रत्येक घटनेची नोंदव पंचनामा सरकारी पातळीवर झाली असली, तरी जनावरांच्या मालकांना ना वन विभागाकडून नुकसानभरपाई मिळाली ना महसूल विभागाकडून त्याचा पाठपुरावा झाला.
भोरगिरी व वेलवळी गावात बिबट्याने नुकतीच दोन वासरांची शिकार केली, त्यापूर्वी या परिसरातूनच एक गाय व आठ शेळ्यांचाही बिबट्याने फाडशा पाडला आहे. त्यामुळे अभयारण्यात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. प्रादेशिक वनविभागातील चासकमान धरण परिसरातही बिबट्याच्या बछड्याचा झालेला अपघात पाहता बिबट्यांची आणखी काही पिले या परिसरात वाढत असल्याचे स्पष्ट असून काही ग्रामस्थांना त्याचे दर्शनही झाले आहे.
अपघातात मृत्यू पडलेल्या बिबट्याचा बछडा सापडला असतानाही या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे सापडले नसल्याचे वनविभाग सांगत असून त्यामुळे अद्याप बिबट्यांच्या उच्छदावर त्यांनी कोणत्याच प्रकारची उपाययोजना केली नाही, दुसरीकडे मात्र परिसरातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक खेड तालुक्याच्या विविध भागात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढल्याचे मागील काही दिवसातील आकड्यावरून स्पष्ट झाले आहे.
तालुक्यात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढलेला असताना, 'तो बिबट्या नव्हेच' अशी विसंगत भूमिका वनविभाग घेत असला तरी वनविभाग गावोगावी जनजागृती करताना मात्र दिसत आहे. पशुधना बरोबर नागरिकांवर होणारे हल्ले पहाता, वनविभाग गस्त, संरक्षण व आवश्यक दक्षता घेत नसल्याचे दिसत आहे.
--
चौकट
बिबट्या लांडगे व तरसचा उच्छाद-
राजगुरुनगर वनखात्यांतर्गत जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ अखेरपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात २६ जनावरे मृत्युमुखी पडली.
लाडंग्याच्या हल्ल्यात २५ आणि तरसाच्या हल्ल्यात १ जनावर ठार झाले. सुमारे ४१ पशुपालकांच्या ५२ पशुधनापैकी ३४ शेळ्या,११ बोकड,२ मेंढ्या आणि गाई बैल प्रत्येकी एक जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदिप कासारे यांनी दिली. मात्र दुसरीकडे भीमाशंकर अभयारण्यातील वरिष्ठ अधिकारी अजुनही पशुपालकांना नुकसानभरपाई देेेेऊ शकलेे नाहीत. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवत असल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करत आहे.
--
चौकट
आत्तापर्यंत एक लाख ३३ हजारांची नुकसानभरपाई
हिंस्त्रश्वापदाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या पशुधनापोटी नुकसानग्रस्त पशुपालकांना १ लाख ३३ हजार ७५० रुपये भरपाई देण्यात आली आहे. तर तालुक्यात ३६ रानडुक्कर,२ कोल्हे आणि एक भेकरामुळे झालेल्या ३९ शेतक-यांचे पीक नुकसानभरपाई पोटी ८८ हजार ६७५ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.