पुणे : दरोडा, घरफोडी, सोनसाखळी चोरी, विश्वासघात, फसवणूक अशा विविध प्रकारे गुन्हेगारांनी २०१५ मध्ये नागरिकांच्या तब्बल १८० कोटी ४८ लाखांवर डल्ला मारला आहे. त्यापैकी केवळ १६ कोटी ५४ लाखांचा ऐवज पोलिसांना हस्तगत करता आला आहे. गुन्हेगारांनी २०१४ मध्ये २३६ कोटींवर डल्ला मारला होता. त्यातुलनेत मागील वर्षीचे प्रमाण जवळपास ५० कोटींनी कमी आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या वर्षभरात दरोड्याचे ४०, जबरी चोरी व सोनसाखळीचे चोरी ७३१, घरफोडीचे ११९४ यांसह अन्य चोऱ्यांचे मिळून एकुण ५ हजार ३७ गुन्हे दाखल झाले. वर्ष २०१४ च्या तुलनेत हे प्रमाण १६५ गुन्ह्यांनी जास्त आहे. तसेच फसवणुकीचे प्रकारांमध्येही वाढ झाली आहे. असे असले तरी २०१४ च्या तुलनेत मागील वर्षी चोरीला गेलेला ऐवज किंवा फसवणुकीतून घेतलेली रक्कम कमी आहे. चोरीमध्ये घरफोडीतून चोरट्यांनी सर्वाधिक१५ कोटी रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. तर दरोड्यातून २ कोटी ८६ लाख रुपये आणि जबरी चोरीतून ५ कोटी ७९ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. आर्थिक फसवणुकीच्या माध्यमातून ११३ कोटींची फसवणुक केली आहे. वाहन चोरीतून १३ कोटी ६१ लाख रूपये किंमतीची वाहने पळवून नेली आहेत.(प्रतिनिधी)खुन, दरोडा, घरफोड्या या गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यात पोलिसांना यश आले असले तरी विनयभंग, बलात्कार व फसवणुक अशा गुन्ह्यांचे प्रमाण इतर गुन्ह्यांच्या तुलनेने लक्षणीय वाढले आहे. वर्ष २०१४ च्या तुलनेत विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यांमध्ये २०१५ मध्ये २५१ ने वाढ झाली आहे. तर बलात्काराच्या प्रकरणांत ६६ गुन्ह्यांची आणि विश्वासघाताच्या प्रकरणात अधिकच्या ३९ गुन्ह्यांची भर पडली आहे.मागील वर्षभरात पुणे व पिंपरी चिंचवड मधील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये २०१४ च्या तुलनेत बलात्कार, विनयभंग व फसवणुकीच्या प्रकारांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये विनयभंगाचे ७०५ गुन्हे दाखल झाले. २०१४ मध्ये हे प्रमाण ४५४ एवढे होते. त्यापैकी अनुक्रमे ६८४ व ४२८ गुन्हे उघडकीस आले. २०१४ च्या तुलनेत मागील वर्षी विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये २५१ गुन्ह्यांची भर पडली आहे. दुसऱ्या बाजुला बलात्काराच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते. २०१५ मध्ये बलात्काराचे एकुण २६४ गुन्हे दाखल झाले असून सर्व गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यात आले आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण १९८ एवढे होते. मागील वर्षी सुमारे ६६ गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. एखाद्याचा विश्वास संपादन करून नंतर त्याची फसवणुक करण्याचे प्रकारही मागील वर्षी वाढले आहेत. २०१५ मध्ये अशाप्रकारचे एकुण १०८ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी ९४ गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वर्षभरात १८० कोटी रुपयांवर डल्ला
By admin | Published: January 06, 2016 12:42 AM