पुणे : ससूनमध्ये विविध ठिकाणांहून गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यात आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील रुग्णांचा भरणा जास्त असतो. असे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वाहनतळ ठेकेदार करारापेक्षा दुप्पट वाहनशुल्काची वसुली करीत असल्याचे समोर आले आहे. तशी पावतीच संबंधित ठेकेदाराने तयार केली आहे.येरवड्यातील पूना स्पोर्ट्स अॅकॅडमीला येथील वाहनतळाचे कंत्राट दिले आहे. निविदेतील नियमानुसार सायकल सोडून प्रत्येक दुचाकीसाठी पहिल्या ४ तासांसाठी ५, तर, १२ तासांसाठी १० आणि २४ तासांकरिता १५ रुपये शुल्क आकारणे अपेक्षित आहे. चारचाकीसाठी पहिल्या चार तासाला १०, तर१२ तासाला २५ आणि २४ तासांकरिता ४० रुपये शुल्क आकारण्याची तरतूद आहे. मात्र, दुचाकीसाठी १२ तासांसाठी १० रुपये आकारण्यात येत आहेत. नियमाप्रमाणे चार, बारा आणि २४ अशी कोणतीही शुल्क आकारणी ठेकेदारेने ठेवलीच नाही. वाहनचालकाला एक तासासाठी वाहन लावायचे असले, तरी १२ तासांप्रमाणे १० रुपये शुल्क आकारले जात आहे. विशेष म्हणजे करारातील नमूद शुल्काचे फलकही ठेकेदाराने लावले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. करारात नियमानुसार शुल्क न आकारल्यास करार रद्द करण्याची तरतुद आहे. प्रशासनाच्या नाकासमोरच वाहनशुल्काची अधिकृत लुट सुरू आहे.वाहन चोरी गेल्यास जबाबदारी ठेकेदारावरवाहन करारानुसार वाहनतळातून वाहन चोरीस गेल्यास, ते गहाळ झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदावर सोपविण्यात आली आहे. निष्काळजीपणामुळे वाहन चोरी झाल्यास संबंधित ठेकेदाराच्या अनामत रकमेतून संबंधित वाहनाची रक्कम वसूल करण्यात येईल, असे नमूद केले आहे. ठेकेदाराने पावतीवरील सूचनेत मात्र ही जबाबदारी नाकारली आहे. त्यात चोरीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार नाही, असे लिहिले असून, वाहन आपल्या जबाबदारीवरच लावावे, अशी स्पष्ट सूचना त्यात करण्यात आली आहे. संबंधित कराराची माहिती सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी उघड केल्याने, ठेकेदाराची ही कृती समोर आली आहे.
ससूनमध्ये वाहन शुल्काची दुप्पट वसुली, कराराला बगल देत केली स्वत:चीच नियमावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 4:26 AM