लोकमत न्यूज नेटवर्क
दावडी : निमगाव ते दावडी या रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे रस्त्यावरील धुळीचा सामाना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. धुरामुळे अनेकांना श्वसनांचे आजार जडले आहेत.
निमगाव ते दावडी या ३ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या वर्षापासून धिम्या गतीने सुरू आहे. हा रस्ता तालुक्याच्या पूर्व भागात तसेच पुढे शेलपिंपळगाव, आळंदी येथे जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे. दावडी या परिसरात सेझ प्रकल्प आल्याने या रस्त्याने मोठी वर्दळ वाढली आहे. शेतकरी याच रस्त्याने शेतमाल विक्रीसाठी बाजारात नेत असतात. रस्त्यावर खडीकरण झाले आहे. दावडी येथील महालक्ष्मी मंदिरापाठीमागील ओढ्यावर पूल उभारण्यात आला आहे. काही ठिकाणी रस्त्यालगत खडीचे ढिगारे पडले आहेत. रस्त्यावर नुसते खडीकरण झाल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करून वाहने चालवावी लागतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धामणटेक फाटा ते दावडी गावापर्यंत ठेकेदाराने रस्त्यावर माती टाकल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांच्या हवेमुळे रस्त्यावर धूळ उडत आहे. त्यामुळे दुचाकी चालक, पादचारी, शेतकरी यांना या धुळीचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शेलपिंपळगावमार्गे अनेक जड वाहने धामणटेक रस्त्याने सेझ परिसरात येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना उडणाऱ्या धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या धुळीने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन ही धूळ नाकातोंडात जाऊन श्वसनांचे विकार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील शेतकऱ्यांच्या शेतमालावर ही धूळ बसत आहे. त्यामुळे पिकेही धोक्यात आली आहे. या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, नागरिक, प्रवाशी, वाहनचालक यांची या धुळीपासून सुटका करावी, अशी मागणी दावडी गावचे सरपंच आबा घारे, उपसरपंच राहुल कदम, हिरामण खेसे, निमगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमर शिंदे पाटील यांनी केली आहे.
फोटो ओळ: निमगाव ते दावडी रस्त्यावर वाहने जाताना रस्त्यावरील उडणारी धूळ.