पुणे : मराठीचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाची नोंद बँकेकडे राहावी म्हणून पुरस्काराच्या रकमेचा चेक आपल्या बँकेच्या माध्यमातून वटवण्यासाठी केलेली धडपड आणि ती पाहून त्या रकमेतील निम्मी रक्कम त्यांनी बँकेत ठेव म्हणून ठेवली, अशा अनेक आठवणी बँक अधिकाऱ्यांनी उलडगडल्या.
पानशेत धरण फुटलं तेव्हा बँकेची इमारत पाण्याखाली गेली तेव्हा केवळ नाव नोंदवून घेत खातेदारांना पैसे दिले. विशेष म्हणजे एकाही खातेदारानं शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतली नाही, हे नंतर हिशेब तपासला असता लक्षात आलं. जप्ती करायला गेलो असताना खातेदाराची आर्थिक स्थिती खरंच हलाखीची असल्याचं लक्षात आल्यावर त्याच्या दोन्ही मुलांना बँकेच्या उद्योजक खातेदाराला सांगून नोकरी लावली. त्यांच्या पगारातून कर्जाची वसुली केली. त्यातून वसुलीही झाली आणि घरही उभं राहिलं... अशी आठवण देखील अधिकाऱ्यांनी ताजी केली.
निमित्त होते, गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित ‘महाराष्ट्राची उद्योजकता आणि प्रेरणादायी बँक’ या चर्चासत्राचे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव पटवर्धन, बँक ऑफ महाराष्ट्र माजी अधिकारी आणि साहित्यिक प्रा. श्याम भुर्के, उद्योजक रामदास माने, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी, बँकिंग क्षेत्रातील निवृत्त अधिकारी भास्कर मांडकेश्वर, श्रीकांत जोशी, रणजित सिसोदिया, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत उपस्थित होते.
खाजगीकरणाऱ्या प्रक्रियेत असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा या वेळी डॉ. वसंतराव पटवर्धन यांनी घेतला.
भावी पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी बँकेत काम करत असताना केलेल्या कामाचे अनुभव जाणकार अधिकाऱ्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवावेत, असं आवाहन डॉ. कामत यांनी यावेळी केलं. या सगळ्या अनुभवांचं पुस्तक करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रा. रवींद्र कोठावदे यांनी निवेदन केले.
......