पुणे - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, पुण्यात रात्री कोसळणाऱ्या मुसळधार पावसातही महाराष्ट्र पोलीस 'ऑन ड्युटी 24 तास' पाहायला मिळाला. भरपावसात ड्युटी संपल्यानंतरही पुण्यातील वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत होते
शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांचे मोठे हाल झाले. शहरातील नागरिक घराची वाट धरत होते, तर पाण्याचा साठा होऊ लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यावेळी, पुण्यातील वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. पोलिसांची उपस्थिती पावसातील नागरिकांना धीर देत होती. या मुसळधार पावसात रस्तावर पाणी साचले असताना नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यास अडथळा होत होता. भूमकर चौकात व इतर चौकात पुणे वाहतूक एसीपी निलिमा जाधव आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी पाण्यात उभे राहून वाहतूक सुरळीत केली. येरवाडा येथील सादलबाद चौकात ड्युटीवर असलेल्या 'अशोक थोपटे' यांनी आपली ड्युटी संपली होती, तरी कर्तव्य बजावले. नागरिकांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहचवण्यासाठी या खाकी वर्दीतल्या माणसांनी कर्तव्यदक्षता दाखवली. पोलिसांच्या या 'ऑन ड्युटी 24 तास'चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच, पोलिसांच्या कर्तव्याचे कौतुकही करण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये गुरुवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा फटका बारामती तालुक्याला बसला. पुरंधर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे क-हा नदीला 50 वर्षात प्रथमच महापूर आला आहे. पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. यातील पाच मृतदेह मिळून आले असून, अन्य मृतदेहांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफच्या तीन पथकांकडून सुरू होते. टांगेवाले कॉलनी ही टांगे चालवणाऱ्यांची कॉलनी आहे. ही कॉलनी नेमकी नाल्याला खेटून आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यावर नाल्याचे पाणी वाढले. अक्षरशः रौद्र रूपाने वाहणारे पाणी कॉलनीतील घरांमध्ये घुसले. भिंती खचल्याने येथील काही घरे पडली. अंगावर भिंती पडल्याने काही जणांच्या मृत्यू झाला. तर काही जण प्रवाहासोबत वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.