पुणे : प्रदूषण कमी करण्यासाठी शहरात ई - बाईक भाडेतत्वावर देणे तसेच या बाईक पुरविणाºया दोन कंपन्यांना या बाईक चार्जिंगसाठी शहरात ५०० ठिकाणी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंगळवारी सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने मंजुर करण्यात आला.
विट्रो मोटर्स प्रा. लि. आणि ईमॅट्रीक्स माईल या कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे़ शहरात विट्रो मोटर्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून भाडेतत्वावर ई बाईक पुरविणे तसेच या कंपनीला शहरात ५०० विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनसाठी व बाईक पार्किंगसाठी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जून २०२० मध्ये शहर सुधारणा समितीने मंजुर केला होता. यानंतर जुलै २०२० मध्येच स्थायी समितीने प्रशासनाकडून अभिप्राय घेतल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करून सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता. डिसेंबर २०२० च्या कार्यपत्रिकेवर असलेल्या या प्रस्तावामध्ये महापालिकेकडे ई बाईक्स पुरविण्याची तयारी दर्शविलेल्या ईमॅट्रीक्स माईल या कंपनीचाही समावेश केला. आज या प्रस्तावाला सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
--------------------
ईबाईकच्या वापरामुळे शहरातील वाढत्या प्रदुषणाला आळा बसणार असून, शहर नव्या बदलाच्या दिशेने वाटचाल सुरू करणार आहे़ ई-बाईक पुरविणे व संबंधित कंपन्यांना शहरात ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशनसाठी जागा देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजुर करण्यात आला आहे़
गणेश बिडकर, सभागृहनेते पुणे मनपा
--------------------