लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ई-पीक पाहणीचे प्रयोग सुरू आहे. ही सुविधा वापरताना नागरिकांना अनेक अडचणी येत असून, या अडचणी दूर करण्यासाठीच भूमि अभिलेख विभागाने खास ई-पीक पाहणी सेवेसाठी कॉल सेंटर सेवा सुरू केली आहे. शेतकऱ्यांना ०२०-२५२१७२१७ या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेता येणार आहे. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू यांनी केले आहे.
येथील भूमि अभिलेख विभाग महाराष्ट्र शासन यांच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख मुख्यालयामध्ये मदत कक्ष, तक्रार निवारण व कॉल सेंटर सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जमाबंदी आयुक्त, एन. के. सुधांशू, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते, उपसंचालक भूमि अभिलेख किशोर तवरेज, उपसंचालक बाळासाहेब काळे, राज्य समन्वयक रामदास जगताप, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार (एनआयसी) समीर दातार व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सुधांशू म्हणाले, कॉलसेंटरबरोबरच जीआयएस व आयटी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर भूमि अभिलेख विभाग करणार आहे. सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी विभागाच्या प्रकल्पांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन लोकाभिमुख आणि जास्तीत जास्त चांगल्या सेवा देण्यासाठी या प्रकल्प नियंत्रण कक्षाची मदत होणार आहे.