पुणे जिल्ह्यात ई-ग्रामस्वराज्यमध्ये वेल्हे तालुका सलग चौथ्या वर्षी देखील प्रथम आला, तर पुणे विभागात सहावा क्रमांक आला असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे
यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना गटविकास अधिकारी विशाल शिंदे म्हणाले की १५ व्या वित्त आयोगाच्या
सन २०२१-२२ मध्ये तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीनी ई-ग्रामस्वराजमध्ये काम केले आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या
खर्च करण्यासाठी प्राधान्यक्रमाने आराखडा ई-ग्रामस्वराज या संगणक प्रणालीमध्ये भरावे लागत आहे. तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीने दिवसरात्र काम करुन जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तालुक्यातील
गटविकास अधिकारी विशाल शिंदे, विस्तार अधिकारी महेश दळवी, ललिता चौधरी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नितीन ढुके, तालुका संगणक
व्यवस्थापक कोमल सणस,गणेश यादव,आंजिक्य गायकवाड, खुशबू कांबळे व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक आदींनी एकत्र येऊन संगणकावर इ-ग्रामस्वराज संगणक प्रणालीमध्ये
तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या निधी खर्चाच्या आराखडा अद्ययावत केला. यासाठी गावोगावी नियोजनाबाबत बैठक घेण्यात आल्या.यामध्ये वंचित घटकातील लोकांच्या बैठका,बालसभा,ग्रामसभा,मासिक सभा घेण्यात आल्या. यामध्ये गावांच्या गरजेनुसार कामांची निवड
करण्यात आल्याची माहिती विस्तार अधिकारी महेश दळवी यांनी दिली.
वेल्हे तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगरी असून या परिसरात मोबाईल व इंटरनेट सेवेचा अभाव आहे. पानशेत व पासली परिसरात
कोणतेही नेटवर्क येत नसताना देखील रेंजच्या ठिकाणी येऊन काम केले आहे. पानशेत विभागातील ग्रामसेवक यांनी खानापूर येथे
रेंज असलेल्या ठिकाणी काम केले. यामध्ये प्रदीप तांबे,गजेंद्र पवार यांनी परिसरातील ग्रामसेवकांना सहकार्य केले. तर वेल्हे विभागातील
ग्रामसेवकांनी विस्तार अधिकारी महेश दळवी यांच्या निवासस्थानी काम केले. यामध्ये विजय सानप,अमित जाधव यांनी ग्रामसेवकांना मदत
केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर,वेल्ह्याच्या पंचायत समितीचे
सभापती दिनकर सरपाले,जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही प्रकारची रेंज वेल्ह्यात नसताना तालुक्यातील ग्रामसेवकांनी एकमेकांना मदत करत ई-ग्रामस्वराजमध्ये
काम केले आहे. - नितीन ढुके - अध्यक्ष, ग्रामसेवक संघटना वेल्हे