राजानंद मोरे - पुणे : रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आता डिजिटल होत असून, पहिल्यांदाच पुणे विभागात ई-पेट्रोलिंग सुरू होणार आहे. संपूर्ण विभागाचे जिओ मॅपिंग केले जाणार असून, मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रत्येक कर्मचाऱ्याचा ठावठिकाणा कळणार आहे. त्यांच्यावर अधिकाऱ्यांचा सतत वॉच राहील. देशात पहिल्यांदाच पुणे विभागामध्ये हा प्रयोग केला जाणार आहे. ‘आरपीएफ’वर रेल्वे स्थानके, रेल्वेगाड्यांसह रेल्वेच्या परिसरातील प्रवासी, मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी असते. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामे व ठिकाणे निश्चित केली जातात. पण संबंधित कर्मचारी निश्चित ठिकाणी आहे किंवा नाही, त्याची दैनंदिन कामे पूर्ण होत आहेत का, याबाबत लगेच माहिती मिळत नाही. त्यादृष्टीने ‘आरपीएफ’कडून ई-पेट्रोलिंग हे सॉफ्टवेअर व अॅप विकसित केले जात आहे. हे अॅप आरपीएफच्या प्रत्येक कर्मचारी व अधिकाºयाच्या मोबाईलमध्ये असेल. या अॅपमध्ये प्रत्येकाने लॉगीन केल्यानंतर ते ज्या ठिकाणी जातील, ते ठिकाण नियंत्रण कक्षात समजणार आहे. त्यानुसार संबंधितांना आवश्यकतेनुसार अॅपवरच सूचनाही दिल्या जातील. यामुळे कर्मचाºयांच्या कामावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे.याविषयी माहिती देताना आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त अरूण त्रिपाठी म्हणाले, ई-पेट्रोलिंगमध्ये संपूर्ण विभागाचे जिओ मॅपिंग करून क्षेत्र निश्चित केले जाईल. कोणत्या ठिकाणी कोणते गुन्हे, घटना किंवा इतर घडामोडी कोणत्या वेळेत घडतात, याचीही माहिती संकलित केली जात आहे. त्यानुसार ही माहिती व ठिकाण अॅपवर निश्चित केले जाईल. कर्मचाºयांच्या कामाचे ठिकाणीही निश्चित केले जाईल. त्यांना ही माहिती समजेल. त्यानुसार ते काम करतील. काही कर्मचाºयांचे काम फिरते असेल. तर काहींना आपत्कालीन स्थितीत काम दिले जाईल. प्रवाशांना वेळेत मदत पोचविण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. ही सर्व माहिती अॅपवर उपलब्ध राहील. कर्मचाºयांच्या कामाचा वेग व क्षमता वाढविण्यासाठी हे अॅप फायदेशीर ठरेल. सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरत येथील एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. सध्या हे काम प्राथमिक पातळीवर असून पुढील सहा महिन्यांच्या आत ते कार्यान्वित होईल. पश्चिम रेल्वेमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या पेट्रोलिंगचा प्रयोग झाला आहे. पण पुणे विभागाकडून तयार करण्यात येत असलेली यंत्रणा अधिक अद्ययावत असून देशात पहिल्यांदाच होत आहे. या प्रयोगामुळे ‘पोलिसिंग सिस्टीम’मध्ये नवा बदल होणार आहे.................* असे होईल पेट्रोलिंग.....प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये अॅप असेल. कामाच्या ठिकाणी कर्मचारी आल्यानंतर अॅपवर लॉगीन करावे लागेल. लॉगीन केल्यानंतर संबंधिताला कामाचे क्षेत्र व नेमून दिलेले काम तसेच इतर माहिती उपलब्ध होईल. त्यानुसार तेच काम करावे लागेल. या क्षेत्राच्या बाहेर केल्यास त्याचा अलर्ट नियंत्रण कक्षाकडे जाईल. काही घटना घडल्यास किंवा प्रवाशांना काही मदत हवी असल्यास अॅपवर अलर्ट देता येईल. त्यानंतर तातडीने मदत पोचविणे शक्य होईल.
रेल्वे सुरक्षा दलाचे लवकरच ई-पेट्रोलिंग; कर्मचाऱ्यांवर राहणार नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 4:37 PM
‘आरपीएफ’वर रेल्वे स्थानके, रेल्वेगाड्यांसह रेल्वेच्या परिसरातील प्रवासी, मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी असते.
ठळक मुद्देदेशात पहिल्यांदाच पुणे विभागामध्ये हा प्रयोग केला जाणार पेट्रोलिंगसाठी अॅप, ठावठिकाणा कळणार ई-पेट्रोलिंगमध्ये संपूर्ण विभागाचे जिओ मॅपिंग करून क्षेत्र केले निश्चितसध्या हे काम प्राथमिक पातळीवर असून पुढील सहा महिन्यांच्या आत ते कार्यान्वित होणार