परीक्षा ऑनलाइन होत असल्याने परीक्षेचा महत्त्वाचा असणारा ‘पर्यवेक्षण’ हा घटकदेखील आता वेगळ्या रूपात दिसू लागला आहे. ई-प्रोक्टोरिंग हे ऑनलाइन परीक्षा प्रणालीमधील वापरण्यात येणारे डिजिटल पर्यवेक्षण तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानावर आधारित असलेली परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातून किंवा अन्य सोयीस्कर जागेवरूनच संगणक किंवा मोबाईलचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून देता येते. हे ई -प्रोक्टोरिंग तंत्रज्ञान नेमके काम कसे करते? याबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल आहे.
ई-प्रोक्टोरिंग तंत्रज्ञानात ऑनलाइन परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या संगणकाचा किंवा मोबाइलचा कॅमेरा आणि माइक्रोफोन वापरून तसेच त्याच्या वेब ब्राउझरच्या हालचालींचा डेटा जमा करून त्यांचा सखोल अभ्यास केला जातो. त्यातून कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करून परीक्षा देतानाचे विद्यार्थ्यांचे वर्तन एका प्रोग्रॅमच्यामार्फत ठरवले जाते.
लाईव्ह प्राक्टोरिंग या प्रकारात विद्यार्थ्यांचा वेब कॅमेरा आणि माइक या माध्यमातून लाइव्ह व्हिडिओ मानवी पर्यवेक्षकांना उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे ते स्वतः विद्यार्थ्यांचे परीक्षा देतानाचे वर्तन पाहून पर्यवेक्षण करू शकतात. या प्रकारात विद्यार्थ्यांकडेदेखील उत्तम बॅण्डविड्थची इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक असते. या पद्धतीमध्ये मानवी पर्यवेक्षकांकडून परीक्षेमधील विद्यार्थी वर्तनाची देखरेख होत असल्याने परीक्षेच्या विद्यार्थी संख्येला बऱ्याच मर्यादा आहेत. छोट्या स्वरूपाच्या परीक्षा या प्रोक्टोरिंगच्या प्रकारे घेता येतात.
दुसरी अद्ययावत ई-प्रोक्टोरिंग पद्धती म्हणजे कृत्रीम बुद्धिमत्ता वापरून केलेली देखरेख. या ई-प्रोक्टोरिंग तंत्रज्ञानात एका विशिष्ट प्रोग्रामच्या माध्यमातून परीक्षा देताना विद्यार्थ्यांचा वेब कॅमेरा कंट्रोल करून त्याचे ठरावीक वेळेत फोटो काढण्यात येतात. तसेच वेब ब्राउझरच्या हालचालीदेखील टिपल्या जातात. हे फोटो आणि स्टुडंट ॲक्टिव्हिटीचा डेटा परीक्षेच्या सर्व्हरवर सतत पाठवण्यात येत असतो. ऑनलाइन परीक्षा घेण्याऱ्या सर्व्हरवर कृत्रीम बुद्धिमत्ता (एआय) वापरून हा डेटा प्रोसेस केला जातो. प्राप्त झालेल्या फोटोंमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती तर नाही ना ? तसेच सर्व फोटोतील व्यक्ती एकच आहे ना ? आदी प्रकारचे रिपोर्ट तयार केले जातात. त्यातून प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक प्रॉक्टर स्कोर तयार केला जातो. स्वीकृत मर्यादेपेक्षा जास्त प्रॉक्टर स्कोर असणाऱ्या मुलांचा रिपोर्ट सिस्टिम तयार करते. त्यानंतर मानवी पर्यवेक्षकाकडे फोटोंसह हा रिपोर्ट आणि अलर्ट पाठवला जातो. त्यावर पर्यवेक्षक अंतिम निर्णय घेऊ शकतो.
त्याचबरोबर विद्यार्थ्याने किती वेळा वेब ब्रॉउझर बदलला, परीक्षा सुरू असताना अन्य कोणत्या वेबसाइटना भेट दिली का? याचा देखील डेटा जमा केला जातो आणि परीक्षा सर्व्हरकडे पाठवला जातो. ई-प्रोक्टोरिंगचा प्रोग्राम हा डेटा अभ्यासून विद्यार्थ्यांचे वर्तन ठरवतो. तसेच संशयित विद्यार्थ्यांचा रिपोर्ट मानवी पर्यवेक्षकांकडे पाठवला जातो. ही ई-प्रोक्टोरिंग पद्धत जास्त विद्यार्थिसंख्या असणाऱ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे. कारण मानवी पर्यवेक्षकाला फक्त एआय प्रोग्राममधून रिपोर्ट झालेल्या विद्यार्थ्यांचेच वर्तन जमा झालेल्या डेटाच्या आधारे अभ्यासावे लागते.
सध्याचे कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित प्रगत ई-प्रोक्टोरिंग प्रोग्रॅम तर अतिशय चातुर्याने फोटो, आवाज तसेच हालचालींचा डेटा गोळा करत सखोल अभ्यासपूर्ण रिपोर्ट्स तयार करीत आहेत. ज्यात परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरून त्याच्या परीक्षा देतानाच्या वेळी असलेल्या मन:स्थितीचे विश्लेषण अंतर्भूत करता येऊ शकते.
दिवसेंदिवस जस-जसे ऑनलाइन परीक्षेची व्याप्ती वाढत आहे, तस-तसे हे ई-प्रोक्टोरिंग तंत्रज्ञानदेखील प्रगत होणे काळाची गरज बनत चाललेली आहे. पुढील काळात प्रोक्टोरिंग तंत्रज्ञानाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.
- दीपक हार्डीकर, संगणक तज्ज्ञ