पुणे : इंधनखर्च आणि प्रदूषण कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने स्वारगेट-मुंबई या मार्गावर सुरू केलेल्या ई-शिवनेरीला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत असून, एसटी महामंडळालादेखील आर्थिक फायदा होत आहे. १ मे पासून ठाणे-स्वारगेट, दादर-पुणे स्टेशन या मार्गावर ई-शिवनेरी बस सुरू करण्यात आल्या. आता पुण्यातून स्वारगेट-दादर, बोरिवली, ठाणे आणि पुणे स्टेशन-दादर या मार्गावर एकूण ४४ ई-शिवनेरी धावत असून, सप्टेंबर ते फेब्रुवारी २०२४ या सहा महिन्यांत महामंडळाला २२ कोटी ३१ लाख ५८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
वाढत्या प्रतिसादमुळे १४ ई- शिवनेरी वरून आता ४४ वर
सुरुवातीला ठाणे-पुणे मार्गावर १४ ई- शिवनेरी बस धावत होत्या. नंतरच्या काळात त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, सध्या या मार्गावर ४४ बस धावत आहेत. प्रत्येक बसच्या दररोज ३ फेर्या होतात. शिवनेरीची संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाईल चार्जिंग आणि प्रकाशदिवे उपलब्ध आहेत. बॅगा ठेवण्यासाठी बसच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था असून, बसमध्ये ४३ प्रवासी बसू शकतात. एकदा संपूर्ण बॅटरी चार्ज केल्यावर ३०० किलोमीटरचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे. इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषणमुक्त प्रवास होतो आणि इंधनावरील खर्च कमी करण्यास मदत होते. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेवरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी ई-शिवनेरीच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत.
पुणे स्टेशन-दादर आघाडीवर...
गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेल्या आकडेवारीनुसार पुणे-स्टेशन दादर या मार्गावर जादा उत्पन्न मिळाले आहे. तर प्रवासी संख्येत स्वारगेट-ठाणे या मार्गावर जास्त आहे. सकाळच्या टप्प्यात चाकरमान्यांकडून या बसेसला जादा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या गाड्यांची संख्या वाढविण्यात येत आहे.
...अशी आहे ई-शिवनेरीची आकडेवारी
मार्ग उत्पन्न प्रवासी संख्यापुणे स्टेशन-दादर ६,३६,९८,२९७ १,७३,२८३स्वारगेट-ठाणे ६,६१,०५,६२९ १,९३,२९९स्वारगेट-दादार ६,३६,२३,२४६ १,८०,०४७स्वारगेट-बोरिवली २,९७,३१,०९९ ८४,३३४