श्रीकिशन काळे - पुणे : विविध वाहनांच्या टाकाऊ पार्टपासून एखादी इलेक्ट्रिक गाडी बनविता येऊ शकते. हा प्रयोग प्रत्यक्षात उतरविण्याचे काम आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी ई-व्हेईकल तयार केली असून, या गाडीसाठीचे सर्व पार्ट टाकाऊ वस्तूंपासून घेतले आहेत. ही गाडी महापालिकेच्या अंतर्गत कामासाठी वापरण्यात येणार आहे.आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी यंदा नवीन काही तरी उपक्रम राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ई-व्हेईकल तयार केली. त्यासाठी टाकून दिलेले वाहनांचे सुटे पार्ट जमा केले. ते जोडून इलेक्ट्रिक गाडी बनविली. या गाडीचा वेग ताशी ६० किलोमीटर आहे. तिची बॅटरी रिचार्जेबल आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक अशी ही गाडी तयार करून ‘हम भी किसीसे कम नहीं’ असे आयटीआयच्या या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. या गाडीसाठी इलेक्ट्रिशियन निर्देशक प्रमोद मुळे आणि वर्गशिक्षक नितीन डोखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर, इलेक्ट्रिशियन द्वितीय वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. सैफ अली सारवान, योगेश भोकरे, तानाजी लुगडे, सागर खापरे, हर्षल मरळ, प्रफुल्ल तारू, अनिकेत जगताप, अभिजित शिंदे, अजय भोंडवे, तेजस शिवतारे, केदार कुंभार, शुभम पांगारे, साहिल चीलवंते, विघ्नहर्ता माटे, आदित्य ओंबळे, आदित्य कांबळे, मुकेश दातरंगे, केशव भोरडे, जय पवार, गणेश सोलाट या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. .........पेट्रोल-डिझेल वापरल्यामुळे दररोज कार्बन डायआॅक्साइड वातावरणात जातो. त्याने पुणे शहराचे प्रदूषण वाढत आहे. म्हणून आम्ही कार्बन कमी करण्यासाठी काही तरी नवीन कल्पना समोर आणली. त्यातून आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही इलेक्ट्रिक गाडी बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार टाकून दिलेले गाड्यांचे पार्ट जमा केले आणि आम्ही कामाला लागलो. - योगेश भोकरे, विद्यार्थी
सध्या प्रदूषण खूूप वाढत आहे. त्यामुळे आम्ही पर्यावरणपूरक गाडी बनविण्याचे ठरविले. त्यामध्ये सर्व टाकाऊ वस्तूंचा समावेश आहे. विविध ठिकाणांहून भंगारातील वाहनांचे पार्ट संकलित केले. तसेच, शाईन दुचाकी वाहनाचा सेकंड हॅँडे डिस्क ब्रेक या ई-व्हेईकलला लावला आहे.- नितीन डोखे, मार्गदर्शक