निलेश राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीची महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कमतरता निर्माण झाली असून, परिणामी शहरातील ७७ लसीकरण केंद्रांना बुधवारपासून (दि. ४ मार्च) शंभर ऐवजी केवळ दहा ते वीसच डोस वितरित करण्यात येणार आहेत़ यामुळे शहरातील ७७ केंद्रांवर लसीकरणाचा गोंधळ उडण्याची दाट शक्यता असून, ऐनवेळी नावनोंदणी करून जाणाऱ्या नागरिकांना लस न घेताच परतावे लागणार आहे़
पुणे महापालिकेला राज्य शासनाकडून लसीकरणासाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी तसेच तिसºया टप्प्यातील (ज्येष्ठ नागरिक व अन्य आजाराच्या व्यक्ती) लसीकरणासाठी आजपर्यंत २ लाख २२ हजार ८०० लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत़ १६ जानेवारीपासून कमला नेहरू रूग्णालयात सुरू झालेल्या लसीकरणाची व्याप्ती वाढून, आजमितीला शहरात ४४ शासकीय लसीकरण केंद्रासह खाजगी रूग्णालयातील ७७ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे़
केंद्राच्या नियमानुसार प्रत्येक केंद्रावर दररोज १०० डोसच दिले जाणे आवश्यक आहे़ परंतु, अनेक ठिकाणी माननीयांच्या आग्रहाखातर ही संख्या १२५ ते १५० च्या आसपासही जात आहे़ गेल्या दोन दिवसातील आकडे पाहता दररोज १२ हजारापेक्षा जास्त लस दिल्या गेल्या आहेत़ त्यातच काही खाजगी रूग्णालयांनी आगाऊ रक्कम भरून जास्तीचे लसीचे डोस घेतले आहेत़ परिणामी महापालिकेकडील आत्तापर्यत १ लाख ९८ हजार ९३० डोस वापरात आले आहेत़ लसीचे डोस वितरित करताना त्यातील १० टक्के डोस हे वेस्टेज गृहित धरले जातात़ यामुळे सध्या महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या २३ हजार ८७० डोसचे वितरण करणे कठीणप्राय बनले आहे़
--------------------
डोसचा पुरवठा शंभरहून वीसवर
राज्य शासनाकडून पुढील लस पुरवठा होईपर्यंत उपलब्ध साठा ७७ केंद्रावर वितरित करताना आजपासून तो मर्यादित स्वरूपात करण्यात येणार आहे़ परिणामी प्रत्येक केंद्राला आता शंभर ऐवजी जास्तीत जास्त वीसच डोस पुढील दोन दिवस वितरित करण्यात येणार आहेत़
-------------
पुणे महापालिकेला आत्तापर्यंत २ लाख २२ हजार ८०० कोरोना प्रतिबंधक लस प्राप्त झाल्या असून, यापैकी १ लाख ९८ हजार ९३० लस वापरात आल्या आहेत़ सध्या महापालिकेकडे २३ हजार ८७० डोस शिल्लक असून, शिल्लक डोस सर्व केंद्रांवर वितरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे़ परंतु हे वितरण करताना सर्व केंद्रांना समसमान लसीचे डोस पुरविले जाणार असून, नागरिकांनी पुढील डोस येईपर्यंत सहकार्य करावे़
डॉ़ आशिष भारती,
आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका