पुणे : चित्रपटासंबंधी मला जे काही प्रश्न पडतात. त्याची उत्तरं भूमिकेमध्ये मिळतात. कोणतीही भूमिका नटाने अलिप्तपणेच केली पाहिजे. नट म्हणून केलेल्या भूमिकेचा माणूस म्हणून तुमच्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो... उलट तो झाला नाही तर तुम्ही कोरडे नट राहाल, माणूस राहणार नाही... नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिहेरी कला प्रांतात मुशाफिरी करणारे चतुरस्त्र अभिनेते दिलीप प्रभावळकर अभिनयाचे अंतरंग उलगडत होते. महात्मा गांधी यांची भूमिका करताना दडपण आले होते. कारण ही भूमिका करताना मला स्वातंत्र्य नव्हते. मला भावले तसे गांधी साकारणे हा उद्धटपणा ठरला असता, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. दिलीप प्रभावळकर यांना ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे संचालक भूपेंद्र कँथोला, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे अधिकारी किरण धिवार उपस्थित होते. मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये वृद्धाश्रमातील एका वृद्धाची भूमिका मला आॅफर झाली होती. कसे ते माहित नाही पण राजकुमार हिरानीला अचानक वाटले, की मी महात्मा गांधींची भूमिका करू शकतो. केस कापायला सांगितले. त्याच दरम्यान राम गोपाल वर्माचे बोलावणे आले. ‘शिवा’ चित्रपटात एका वाईट गृहमंत्र्याची भूमिका होती, जो मोठ्या गुंडाचा हस्तक असतो. रामला मी म्हणालो, की केस कापले आहेत. टोपी काढून त्याला दाखवले तर तो म्हणाला, असेच बारीक केस हवे आहेत. तासलेल्या डोक्याने हिंसा आणि अहिंसा असलेल्या भूमिका एकाचवेळी मी केल्या...एका अष्टपैलू अभिनेत्याचे हे बोल उपस्थितांना थक्क करून गेले. ‘कथा दोन गणपतरावांची’ चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्याबरोबर काम केलेले डॉ. मोहन आगाशे म्हणाले, की ‘बिकट वाट वहिवाट नाटकात दिलीपने अप्रतिम काम केले होते. त्याच्यासारखा विविध भूमिका केलेला महाराष्ट्रात दुसरा नट नाही. सहज म्हणून भूमिकेत शिरतो. तो अभिनेता म्हणूनच जन्माला आलाय. फक्त अध्येमध्ये तो माणूस असतो. कुतूहल वाटावे अस काम करतो. दिलीप म्हणजे निखळ आनंद आहे. आपण जे अनुभवतो ते त्याच्या नजरेतून पाहणे वेगळा अनुभव आहे, अशा शब्दातं प्रभावळकरांविषयी गौरवोद्गार काढले. आता तो पुण्यात आलाय, त्यामुळे आम्हाला स्पर्धक खूप आहेत, असा टोलाही त्यांनी मित्रवर्याला लगावला.
अजरामर भूमिकाआयुष्यात दोनच अजरामर व्यक्तिरेखा साकारल्या, एक महात्मा गांधी आणि दुसरी भा. रा. भागवत यांची. या व्यक्तिरेखा पडद्यावर उतरवताना तुम्हाला जशा त्या भावल्या तशा करण्याचे स्वातंत्र्य नसते, असे सांगून ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ मधील गांधी यांच्या भूमिकेचे अनुभव प्रभावळकर यांनी कथन केले.