जुन्नर : आदिवासी समाजातील लहानपणी शेळ्या वळणारी, झोपडीवजा घरात राहणारी, गरिबी पाचवीला पुजलेली अशा कुटुंबातील उत्तम धावपटू असलेल्या ज्योत्स्ना भालेकर हिने जिद्द मेहनतीच्या पाठबळावर पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत गरूडझेप घेतली आहे. पोलिस उपनिरीक्षकपदी तिची झालेली निवड तिच्या सारख्याच इतरांना अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी बळ देणारी ठरली आहे.
जुन्नर तालुक्यातील काले - दातखिळेवाडी - तांबे यांच्या लगत असणाऱ्या बाळोबाच्या वाडीत राहणाऱ्या ठाकर समाजातील बाबुशा भालेकर व त्यांची पत्नी तारा आणि दोन मुली व एक मुलगा असे एक कुटुंबीय. घरी अठराविश्वे दारिद्र्य, दुसऱ्याच्या शेतावर राब, राब राबायचे दररोज मोलमजुरी करायची अन् आपल्या चिमुकल्यांसह पोटाची खळगी भरायची, प्रत्येक दिवसाची अशी ही सुरुवात..! अशा या झोपडी वजा घरात डोंगर कपारीत बकऱ्यांच्या पाठीमागे धावत - बाबुशा अन् ताराच्या कुशीत तर कधी पाठीवर बसून ज्योत्स्ना वाढत होती. तिचे प्राथमिक शिक्षण काले येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती हायस्कूल येणेरे येथे झाले.
दररोज चपळतेने अनवाणी उन, वारा, थंडी, पाऊस झेलत चार ते पाच किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या ज्योत्स्नाची चलाखी व चपळता प्रमोद मुळे व सुरेश फापाळे यांनी हेरली. मुख्याध्यापक तान्हाजी लांडे यांनी सर्वोतोपरी मदत केली. त्यांनी तिला धावण्याचे प्रशिक्षण दिले. धावण्याच्या क्रीडा प्रकारामध्ये तालुका, जिल्हा राज्य पातळीपर्यंत उल्लेखनीय यश मिळवले.
रांची याठिकाणी क्रॉस कंट्री या स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवला .पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, छत्रपती हायस्कूल येणेरे, ग्रामस्थ गिरिजात्मक पतसंस्था, येणेरे ग्रामस्थ यांनी वेळोवेळी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने तिच्या अकरावी ते पदवी पर्यंतचे शैक्षणिक पालकत्व घेतले. २०१८ मध्ये खेळाडूंच्या कोट्यातून तिची मुंबई लोहमार्ग पोलिस दलात निवड झाली. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सन २०२० मध्ये दिलेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल आता घोषित झाल्यावर तिची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली.
माझे यश इतरांसाठी प्रेरणादायी
मला मिळालेले यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. या यशात आई वडील, शाळा, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या पाठबळामुळे इथपर्यंत पोहचता आले. माझी बहीण सुदेशना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी करतेय तर भाऊ हडपसरला ११ वी मध्ये शिकत आहे. असेही तिने यावेळी सांगितले.