पूर्वी म्हणत देश धोक्यात, आता म्हणतात मोदी धोक्यात; नाना पटोलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 01:44 PM2022-01-11T13:44:33+5:302022-01-11T13:44:53+5:30
देशाची सार्वजनिक संपत्ती खासगी उद्योजकांना विकून केंद्र सरकार देशाचे नुकसान करत आहे
पुणे : देशाची सार्वजनिक संपत्ती खासगी उद्योजकांना विकून केंद्र सरकार देशाचे नुकसान करत आहे. पूर्वी देश धोक्यात आहे म्हणत, आता मोदी धोक्यात आहेत असे म्हणू लागले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने भारतात मोदी सरकारची लोकशाही की खासगीशाही? या विषयावर फेसबुक लाईव्हद्वारे “ समारोपाचे - ६ वे चर्चासत्र रविवारी झाले. पटोले अध्यक्षस्थानी होते. जयंतराव माईणकर, सोहनकुमार बोस यात सहभागी झाले होते. समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी स्वागत केले.
पटोले म्हणाले, खासगीकरणामुळे सर्वसामान्यांचे अधिकार संपुष्टात येतील. आज मोदी सरकार बँकेत पैसे ठेवायला आणि बँकेतून पैसे काढायलाही पैसे मागत आहे. रेल्वे, विमानतळ, विमानसेवा, बँका, बंदरे, एलआयसी या सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण झाले. यातून सार्वभौम देशाचे स्वातंत्र्य संपुष्टात येत आहे.
नॅशनल रेल्वे मजदूर संघाचे कार्याध्यक्ष बोस म्हणाले, रेल्वेच्या विविध विभागांचे खासगीकरण सुरू आहे. रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात सुविधा देते, उद्या खासगीवाले ग्रामीण किंवा दुर्गम भागत सेवा देणार का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे.
माइणकर म्हणाले, मोदींच्या कार्यकाळात देशातील खासगी घराणीच मोठी झाली. भारतीय जनता पार्टीला थोपवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे. बंगाल आणि दिल्लीत याची सुरुवात झालेली दिसते. आता ५ राज्यांत काय होते ते महत्त्वाचे ठरणार आहे. समिती सदस्य शशांक पाटील यांनी आभार मानले.