पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकत कराचे तब्बल २२ कोटी रुपये थकीत असल्याने पुणे महापालिकेने या रुग्णालयाला जप्तीची नाेटीस पाठविली आहे. दाेन दिवसांत रक्कम जमा करावी, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. त्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पालिकेला उत्तर दिले आहे. या थकीत मिळकत कराबाबत येत्या दोन दिवसात पालिकेत सुनावणी होणार आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. ‘अनामत दहा लाख रुपये भरा, मगच उपचार करू’, अशी भूमिका घेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने रुग्ण आणि नातेवाइकांची अडवणूक केली. त्याचवेळी महापालिकेचे मिळकत कर भरण्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून कर भरण्याबाबत हात झटकले. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ रुग्णालयावर टीकेची झाेड उठली. सजग नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या मेहरबानीवर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आणि २२ कोटींचा मिळकत कर थकविल्याबाबत अखेर रुग्णालयाला नाेटीस पाठविली आहे.
एरंडवणा येथील सदर रुग्णालय हे लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या मालकीचे आहे. मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत सदर मिळकतीवर जप्तीची कारवाई करावी, असे ताेंडी आदेश देण्यात आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनला ७ एप्रिल रोजी नाेटीस बजावली होती. त्यावर नोटिसीला दीनानाथ रुग्णालयाने उत्तर दिले आहे. त्यामुळे या थकीत मिळकत कराबाबतची सुनावणी पालिकेमध्ये दोन दिवसांमध्ये होणार आहे, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.