कात्रज (पुणे) : शुक्रवारी पहाटेच्या वेळी गंगाधाम शत्रुंजय मंदिर रोडवर असणाऱ्या आई माता मंदिराजवळ मोकळ्या जागेत असलेल्या एका गॅरेजला आग लागल्याची घटना घडली. आग पहाटे ३:२० लागल्याची माहिती मिळाली यामध्ये गॅरेजमधील १७ चारचाकी वाहने जळून खाक झाली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची ४ वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये कोणीही जखमी नसून जिवितहानी देखील नाही. आगीचे नेमके कारण समजले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
या लागलेल्या आगेचे लोट खूप मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे परिसरात धूर पसरला होता. पहाटेची वेळ असल्याने त्याचबरोबर रस्त्यावर गर्दी नसल्याने अग्निशमन यंत्रणा लवकर घटनास्थळी पोहचली व आग लवकर आटोक्यात आली. आगीमध्ये गॅरेजमधील एकूण १७ चारचाकी वाहने जळाली असून यामध्ये बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, रेंज रोव्हर, स्कोडा, हुंदाई, फोर्ड या कंपन्याची वाहने दुरूस्तीकरिता आले असल्याचे समजले. तसेच सदर गॅरेजचे नाव हे मतीन कार केअर्स असे आहे.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी संजय रामटेके, कैलास शिंदे, तांडेल मनीष बोंबले, महादेव मांगडे, फायरमन शैलेश गोरे, राजेश घडशी, निलेश वानखडे, वैभव राऊत, कुणाल खोडे, मंदार नलावडे यांनी सहभाग घेतला.