पुणे : किराणा माल अथवा औषध घेण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर पुणेकरांना सहजपणे महापालिकेचा मिळकतकर भरता येणार आहे. पुणेकरांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांतील ५०० किराणा दुकाने व मेडिकलमध्ये मिळकतकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिकेचा मिळकतकर भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय अथवा पालिका भवनात गर्दीत रांगेमध्ये उभे राहावे लागते. त्यात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडीतून व पार्किंगची समस्या यावर मात करून खास मिळकतकर भरण्यासाठी अनेकांना वेळ काढावा लागतो. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालये व पालिका भवन येथे सध्या कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय बँक आॅफ महाराष्ट्र, जनता सहकारी बँकसारख्या विविध बँकांच्या २०० हून अधिक शाखांमध्ये देखील मिळकतकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये अधिक सुलभता व सहजपणा आणण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या वतीने ‘भारत बिल पेमेंट सिस्टिमद्वारे (बीबीपीएस)’ आपल्या घरालगतच्या किराणा दुकान अथवा मेडिकलमध्ये पाणीपट्टी अथवा मिळकतकर भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मेडिकल व किराणा दुकानांची निवड करण्याचे काम सुरू असून, लवकर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शहारातील सुमारे ५०० किराणा दुकाने व मेडिकलची यासाठी निवड करण्यात येणार आहे. या दुकानांना भारत बिल पेमेंट सिस्टिम उपलब्ध करून देण्यात येईल. यामध्ये संबंधित दुकानदारांना एका व्यवहारासाठी १५ रुपये चार्ज देण्यात देणार आहे. परंतु यामुळे पुणेकरांची मोठी सोय होणार असून, मिळकतकर सहजपणे कोठेही भरता येणार आहे. (प्रतिनिधी)
मिळकतकर भरा किराणा दुकानात
By admin | Published: April 24, 2017 5:18 AM