पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखडा राज्य शासनाने मंजूर केल्याने, या गावांच्या विकासाचा मार्ग सुकर झाल्याचे मत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी व्यक्त केले आहे़
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, पीएमआरडीए व राज्य सरकारचे आभार मानत विकास आराखडा मंजुरी ही राज्यातील पहिली घटना असल्याचे सांगितले़ एखादे गाव महापालिकेत समाविष्ट झाले असतानाच लागलीच तेथील नागरिकांना क्रीडांगणे, उद्याने, शाळा, रस्ते यांचा लेखाजोखा मिळाला आहे़ त्यामुळे या गावांच्या विकासाला लागलीच सुरूवात होणार आहे़ या निर्णयामुळे या २३ गावांच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे सांगितले़
काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी २३ गावांचा प्रारूप विकास आराखडा समितीकडे सादर झाल्याने, २३ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगितले़ लवकरात लवकर या २३ गावांमधील हरकती सूचना घेऊन, त्वरित विकास करावा, ही गावे आपण घेतली पण त्याचे गावपण जपण्याची संधी या निर्णयामुळे लोकप्रतिनिधींना मिळाली असल्याचेही ते म्हणाले़