आणे : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पठारावर असलेल्या आणे, शिंदेवाडी, नळावणे, पेमदरा या चारही गावांत पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून शेतकऱ्यांवर जनावरांसाठी पाणी व चाºयासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असलेल्या या चारही गावांत या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने आक्टोबरपासूनच पिण्याच्या पाणीटंचाई भासू लागली आहे. शिंदेवाडी व पेमदरा परिसरात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.आणे गावठाण हद्दीत बेल्हे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे पाणी येते; परंतु तेही कधी दिवसाआड, तर कधी दोन दिवसांनी मिळते. इतर वस्त्यांसाठी १० हजार लिटरचा एक टँकर असून त्याच्या दररोज फक्त दोनच फेºया होतात. ग्रामपंचायतीकडे पाण्याची मागणी नोंदविल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी पाणी मिळते. तेही वस्त्यांवरील विहिरीत सोडल्यावर पिण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे अनेकांना पिण्यासाठी जार विकत घ्यावे लागतात.आणे गावाच्या हद्दीत सहा पाझर तलाव आहे. शिवाय, ओढ्यावर ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. परंतु, या वर्षी एकही मोठा पाऊस न झाल्याने सर्व तलाव व विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे या वर्षी पिके तर नाहीतच; पण जनावरांसाठी चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.पठारावरील अनेक शेतकऱ्यांचा शेतीपूरक दुग्धव्यवसाय असून हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे; परंतु जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकºयांवर आपली दुभती जनावरे कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे. आणे पठारावर चारही गावांमध्ये पशुवैद्यकीय अहवालानुसार ६,७२६ इतके पशुधन असून त्यामध्ये दुभत्या जनावरांची संख्या अधिक आहे. दुग्धव्यवसाय हा येथील शेतकºयांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून पाणी व चाºयाअभावी हा व्यवसायही अडचणीत आला आहे.शिंदेवाडी गावाच्या हद्दीत तीन पाझर तलाव, दहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व दोन गावतळी असून त्यातील पाणी सहा महिन्यांपूर्वीच संपले आहे. तीन हजार लोकवस्ती असलेल्या शिंदेवाडी हद्दीतील कापुरवाडी, इटकाईमळा, जांभळविहिरा, उक्तावस्ती, हांडेवस्ती, कुंभारशेत, वाघाटीमळा तसेच शिंदेवाडी गावठाणसाठी एकच टँकर असून प्रत्येक वस्तीवर ८ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अनेकदा टँकर नादुरुस्त झाल्याने वेळेवर पाणी मिळत नाही, अशी तेथील ग्रामस्थांची तक्रार आहे.दुष्काळाचा लाभ मिळावा, यासाठी पारनेरमध्ये समावेशाची मागणीआणे पठार जुन्नर व पारनेर तालुक्यांच्या सरहद्दीवर असून तीन बाजूंनी पारनेर तालुक्याने वेढलेले आहे. पारनेर तालुक्यात नेहमीच दुष्काळ जाहीर होत असल्याने तेथील शेतकºयांना अनेक सवलतींचा फायदा मिळतो; परंतु आणे पठारची भौगोलिक स्थिती पारनेरसारखीच असूनही केवळ जुन्नर तालुक्यात असल्याने तेथील शेतकºयांना कोणत्याही सवलतींचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हा भाग पारनेर तालुक्याला जोडण्याची मागणी जोर धरत आहे.
जुन्नरचा पूर्व भाग पाण्याअभावी तहानलेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 1:37 AM