दावडी, निमगाव, काळुस, रेटवडी, गुळाणी या परिसरात (दि. २१) रोजी संध्याकाळी वादळी वारा सुटल्याने अनेक घरांचे पत्रे उडाले. विजेचे सिमेंटी पोल भुईसपाट झाले. निमगाव येथील कव्हाळा ठाकरवाडी येथे शांताराम धाकू केदारी, भीमराव कुंडलिक पारधी, देवराम धोंडिबा गावडे याच्या घरावरील पत्रे उडाले. तसेच घरांची पडझड झाली आहे. तसेच विजेचे खांबही कोलमडले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. रेटवडी येथील सुभाष मुरलीधर रेटवडे यांच्या पोल्ट्री फार्मची वादळी वाऱ्याने भिंत भुईसपाट झाली.गुळाणी येथेही विजेचे खांब भुईसपाट झाले. काळुस येथही काही घरांचे नुकसान झाले आहे.दावडी येथील जाधव-दरा येथेही ३ घरांचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीचे पत्रे वाऱ्याने उडाले आहे. दावडी येथील शेतकऱ्याच्या शेतातील उन्हाळी बाजरी व कारले, कलिंगड या तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी बाजरी वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली. प्रशासनाने युद्ध पातळीवर शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी दावडीचे सरपंच संभाजी आबा घारे, सर्मथ फाऊंडेशनचे अध्यक्ष विजयसिंह शिंदे, निमगावचे माजी सरपंच अमर शिंदे, बबनराव शिंदे, सुभाष हिंगे, संतोष शिंदे, याच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
निमगाव येथील कव्हाळा ठाकरवाडी येथे वादळी वाऱ्याने घराचे छत उडून गेले.
दावडी परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांचे वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले.