मध हे संपूर्ण अन्न आहे. भारतात मध हजारो वर्षांपासून चरक व सुश्रुत या महाऋषींनी आयुर्वेद शास्त्रात वर्णन केले आहे. अजूनही मध औषध म्हणूनच बऱ्याच लोकांच्या घरी असतो, पण अनेक शंका-कुशंकामुळे तो मध वापरतातच असे नाही. मध आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास चांगली मदत करतो. इतर प्रगत देशात तर मध औषध म्हणून फार कमी वापरतात. तेथे मध हे अत्यंत पौष्टिक खाद्य पदार्थ म्हणून न्याहारित ब्रेडबरोबर बटर, जॅमसारखा वापरतात.
मध मुळातच मधमाशांनी फुलांच्या मकरंदाचे सेवन करून, पाचन करून साठविला असल्याने तो आपण खाल्ल्यावर सरळ आपल्या शरीरातील रक्त प्रवाहात मिसळतो. म्हणूनच आयुर्वेदिक औषधे मधातून योगवाही म्हणून घेतात. त्यामुळे मधातील अनेक जीवन सत्वे, क्षार, अम्ले, प्रथिने, प्रेरक घटक तर मिळतातच, शिवाय त्वरित कार्यशक्ती मिळते. एक चमचा मधातून १०० कॅलरिज मिळतात. मधात प्रामुख्याने ग्लुकोज (३८%) व फ्रुकटोज (४०%) मुबलक असतात; पण सुक्रोज साखरेचे प्रमाण नगण्य असल्याने शुगर फ्री तसेच फॅट फ्री असतो. अतिप्राचीन काळापासून मधाचे सेवन पौष्टिक अन्न व औषध म्हणून करतात. अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांना देखील सर्वसाधारण सर्दी, खोकला, अन्नपचन, तसेच शरीरावरील दुखापत, भाजणे, कापणे यावर रामबाण औषध म्हणून उपयोग करतात. आधुनिक विज्ञान युगातदेखील सिद्ध झाले आहे की, मध हा उत्तम अँटी ऑक्सिडेन्ट, अँटी बायोटिक, अँटी व्हायरल, अँटी फुंगलचे गुणधर्माने परिपूर्ण आहे. मध आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास चांगली मदत करतो.
प्रमुख एकपुष्पीय मध लिची, सूर्यफूल , बरसीम, ओवा, बाभूळ, जांभूळ, कारवी, निलगिरी, तुळस, तसेच मल्टिफ्लोरा / बहुपुष्पीय मध...
वातावरणातील बदल व साठवणीच्या स्थितीनुसार मधाच्या नैसर्गिक घटकात थोडेफार बदल होतात. जसे मधाचे स्फटिकीकरण होऊन तो भाग तळाशी किंवा बाजूला एकत्रित होतो व द्रव मध वेगळा होतो. यालाच ग्रानुलेशेन म्हणतात. हे मधात साखर जमा झाल्यासारखे दिसते. त्यामुळे बऱ्याचदा असा गैरसमज होतो की मधात भेसळ झाली आहे किंवा मध अशुद्ध आहे. हीच खरी मधाच्या शुद्धतेची खात्रिशीर परीक्षा आहे. मधाचे किण्वन (फर्मेंटेशन) त्यातील ईस्टचे वाढ होऊन रासायनिक प्रक्रियामुळे ऍसिटिक ऍसिड, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड वायूचे फेसाळ बुडबुडे पृष्ठभागावर दिसतात. मधाचे ग्रानुलेशेनमुळे घट्ट किंवा ग्रॅंनुलेटेड मधच्यावर पातळ मधाचा थर बसतो. त्यात पाण्याचे प्रमाण वाढते. याचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचे प्रमाण २०% पेक्षा अधिक व तापमान ३० डिग्रीपेक्षा जास्त झाल्यास किण्वन होते. त्यामुळे मध आंबल्यामुळे आंबट चव होते व खराब होतो.
सकाळी उठल्याबरोबर मध व लिंबू पाणी घेतल्याने उत्साह व ऊर्जा मिळते. न्याहरीमध्ये दूध, चहा, काॅफी, बरोबर साखऱ्याऐवजी मध वापरतात. तसेच ब्रेडबरोबर जॅमऐवजी मध, हनी बटर किंवा स्प्रेड लावून खातात. जेवणातसुद्धा सलाड, गोड पदार्थ, फळाचे रस, सॅलड इत्यादीमध्ये मध मिसळून घेतात. मधाचा उपयोग गरजेनुसार वजन कमी करण्यासाठी तसेच वजन वाढवण्यासाठी पण होतो. कन्फेक्शनरी व बेकरी उत्पादनात मध वापरतात.
- - धनंजय मनोहर वाखले (लेखक हे मध विषयातील पीएचडीधारक आहेत)