पुणे : शहरातील विविध २५ ठिकाणी महापालिकेच्या मोकळ्या जागांवर आठवडेबाजार सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला जागा उपलब्ध करून देण्यास मुख्य सभेने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून स्वस्त व ताजा भाजीपाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने शहरात आठवडेबाजार भरविण्यासाठी पालिकेकडे जागेची मागणी केली होती. आठवडे बाजारामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच नागरिकांना स्वस्त भाजीपाला उपलब्ध होणार असल्याने पालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करून त्याबाबचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला होता. या प्रस्तावाल स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर तो मुख्य सभेसमोर मांडण्यात आला होता. आठवडेबाजारामध्ये माल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना १० फूट बाय १०च्या प्रतिगाळ्यासाठी प्रत्येकी ५ तासांसाठी १०० रुपये भुईभाडे आकारण्याचे निश्चित करण्यात आले होते; मात्र उप सूचनेनुसार हे भाडे ५० रुपये करण्यात आले आहे. आठवडेबाजार पालिका शाळांची मैदाने सोडून भरविण्याची उपसूचना या वेळी मांडण्यात आली. उपसूचनेसह हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
शहरात २५ ठिकाणी भरणार आठवडेबाजार
By admin | Published: December 22, 2016 2:37 AM