कोल्हापूर : पक्षी निरीक्षण आणि पक्षी जीवन अभ्यास क्षेत्रामध्ये आव्हानात्मक काम करणाऱ्या येथील कु. अक्षया मोहन माने हिला पुण्याच्या इकॉलॉजिस या पर्यावरण विषयक संस्थेचा २०१७ सालचा दिवंगत निवृत्त विंंगकमांडर सी. एम. चाओजी पुरस्कार जाहीर झाला आहे.अक्षया ही गेली आठ वर्षे वन्यजीव व पक्षांसाठी कार्य करत आहे. अहमदनगर जिल्हयातील संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील बिबट्यांच्या वावरामुळे निर्माण झालेला माणूस व वन्यजीवातील संघर्ष, हिमालयातील पर्यटनामुळे पर्यावरण व वन्यजीवन साखळीवर झालेला परिणाम याविषयी तिने अभ्यास केला आहे. त्याचबरोबर पश्चिम घाटातील हॉर्न बिल, कोकणातील देवराया यांचाही तिने अभ्यास केला आहे. गेली सहा वर्षे सलीम अली सेंटर फॉर अर्निथॉलॉजी अॅन्ड नॅचरल हिस्ट्री,कोईमतूर (सॅकॉन) या संस्थेमार्फत अंदमान येथे एडिबल नेस्ट स्विफ्टलेट या पाकोळी वर्गातील पक्ष्यांच्या लोकसहभागातून संवर्धनासाठीच्या उपक्रमात सक्रीय सहभागी आहे. हा पक्षी स्वतच्या लाळेतून संपूर्ण घरटे बांधणारा एकमेव पक्षी आहे. त्याच्या घरट्यापासून बनवलेले किंग सूप औषधी असल्याने त्यांची मोठ्या प्रकरणात तस्करी होते. पक्षी निरीक्षण व पक्षीजीवन अभ्यास क्षेत्रामध्ये संयम राखत, कार्यक्षमपणे त्यांच्या घरट्यांपर्यंत मागोवा घेत पायपीट करावी लागते. या क्षेत्रात महिला अभावानेच कार्यरत आहेत. त्यामुळे हा पुरस्कार विशेष सन्मानाचा ठरला आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पक्षी अभ्यासक अक्षया माने यांना इकॉलॉजिस २०१७ पुरस्कार
By admin | Published: February 17, 2017 1:07 AM