पुणे : महिलांना मतदानापुरते विचारात घेतले जाते, पण त्यांचे मत कधीही विचारात घेतले जात नाही व त्याला महत्वही दिले जात नाही. निवडणूक काळात केवळ हळदी कुंकू, पैठणीचे कार्यक्रम राजकिय पक्ष व उमेदवारांनी घेण्यापेक्षा, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यावर भर द्यावा. अशा अपेक्षा महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
स्त्री आधार केंद्र आणि गरवारे महाविद्यालयाचा पत्रकारिता विभाग यांच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये महिला मतदारांच्या राजकीय सक्षमीकरणा संदर्भात २०० महिलांचा सर्व्हे करण्यात आला. १८ ते ७० वयोगटातील महिलांना या सर्व्हेत निवडणुकीसंदर्भात विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेक्षण चा अहवाल शुक्रवारी स्त्री आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सादर केला.
या सर्वेक्षण मध्ये महिलांनी घरगुती सिलेंडरचे दर कमी व्हावेत, मतदानासाठी वापरली जाणारी ईव्हिएम मशिन आणि निवडणुकीत पारदर्शकता हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच रस्ते, पाणी वीज, आरोग्य विषयक समस्या सोडवणूक करावी अशी मागणी केली. ग्रामीण भागात स्त्री शिक्षण वाढवावे, पुरुषांप्रमाणे स्त्रियांना ही वेतन मिळावे, समाजात वावरताना महिलांना सुरक्षितता मिळावी.निवडणुकीत महिला सक्षमीकरण योजना राबवाव्यात अशा नोंदी ही अनेक महिलांनी या सर्वेक्षणात नोंदविल्या असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. दरम्यान हा सर्वेक्षण अहवाल सर्व प्रमुख पक्ष व उमेदवार यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.