चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्याचा जिल्ह्यात संमिश्र परिणाम जाणवला. रुग्णालये, मेडिकल्स, पेट्रोलपंप आदी ठिकाणी ११ नोव्हेंबरपर्यंत या नोटा स्वीकारण्याची सूट देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणांवर बुधवार दुपारनंतर ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. किराणा, भाजीपाला, कपडे, इलेक्ट्रॉनिक्सपासून ज्वेलर्स दुकानांत नोटा स्वीकारण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. पेट्रोलपंपावर नोटा घेतल्या जात होत्या मात्र बदल्यात तेवढेच पेट्रोल भरण्याची सक्ती केली जात होती. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. शिरूर : येथील डॉ. राजेश खांडरे याबाबत म्हणाले, की निर्णय चांगला असला तरी पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले. आमची वैद्यकीय सेवा आहे. आम्हाला ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे आज या नोटा स्वीकारल्या, मात्र दुपारनंरतर रुग्णांना सुटे पैसे देण्यास १०० व ५० च्या नोटा शिल्लक नसल्याने अडचण निर्माण झाली. अनेक मेडिकल्समध्ये जाऊन चौकशी केली असता त्यांनीही नोटा स्वीकारल्या, मात्र सुट्या पैशांची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असणाऱ्या सुनील शर्मा यांनी नोटा बंद केल्याने आजच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे सांगितले. आम्हाला दररोज रोख पैसे लागतात. मात्र आज व्हेंडर्सनी ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने दिवसाचा तोटा सहन करावा लागल्याचे सांगितले. भाजीपाला व्यावसायिक किशोर पानसरे यांनीही पैसे स्वीकारल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. मात्र ५० रुपयांची भाजी घेणाऱ्यास ४५० रुपये सुटे द्यायचे कोठून हा प्रश्न निर्माण झाला. मासळी विक्रेता नीलेश मलंग म्हणाले, नोटा स्वीकारल्या नाही तर मग धंदा नाही. त्यामुळे सर्रास ५०० व १००० च्या नोटा स्वीकारल्या. आम्हाला रोज रोखीने व्यवहार करावा लागतो. बुधवार असल्याने आज सराफ बंद होता. केवळ एक दुकान सुरू होते. या दुकानदारानेही ५०० व १००० च्या नोटा स्वीकारल्या, मात्र सोन्याचा भाव वधारल्याने ग्राहकांची संख्या कमी जाणवली.नारायणगाव : येथील रिलायन्स पेट्रोलपंपाने ५00 व १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याचाफटका वाहन चालकांना बसला. सर्वसामान्य नागरिकांनी मात्र, या निर्णयाचे स्वागत केले आहे. शाळा सुरु होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक साहित्य विकत घेता आलेले नाही. चाकण : एरवी नित्याचे वाहतूककोंडीचे चित्र असताना आज मात्र पुणे-नाशिक महामार्ग व मुंबई-नगर राज्य मार्गावर आज वाहनांची वर्दळ कमी होती. मोठ्या रकमेची विल्हेवाट कशी करायची, म्हणून लोकांनी सोनेखरेदीवर भर दिला.दिवसभरात चाकण शहरात उच्चांकी सोन्याची विक्री झाली. याचा फायदा घेऊन एका सोनाराने चढ्या भावाने सोन्याची विक्री केली, असे नागरिकांकडून समजले. भोर : तालुक्यातील पेट्रोलपंप, दुकानात, एसटी प्रवासात व कोणत्याही खरेदीसाठी सुटे पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सर्वत्र नागरिकांना वादावादी करावी लागत असून, यामुळे अनेकांना सुट्या पैशांअभावी बाहेरगावी जाता येत नाही. पेट्रोल घेता येत नसल्याने स्वत:च्या गाडीतून प्रवास करता येत नाही. मोबाईलला रिचार्ज मारता येत नाही.५०० रुपयांचे पेट्रोल भरावे लागत असून, सुटे पैसे नसल्याने अनेकांना पेट्रोल न भरताच परत यावे लागत आहे. यामुळे बाहेरगावी जाता येत नसल्याचे नितीन धारणे यांनी सांगितले.भिगवण : भिगवण हे पुणे-सोलापूर मार्गावरील प्रमुख गाव असल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना पेट्रोलपंप आणि हॉटेल या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागला. सोन्या-चांदीचा व्यवसाय करणाऱ्या सराफी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून यातून आपली सुटका करून घेतल्याचे दिसून आले. भिगवणमधील मासळी बाजारातही याचे परिणाम दिसून येत होते. तसेच दिवसभर हॉटेलमध्ये या नोटा स्वीकारल्या नाहीत. मेडिकल दुकानदार यांनीही नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने सामान्य नागरिकांचे हाल झाले.निरगुडसर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील निरगुडसर, जवळे, भराडी, पारगाव, शिंगवे, नागापूर, वळती, तसेच पूर्व भागातील सर्वच गावांमधील बुधवारी सकाळपासूनच किरकोळ व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले़ किराणा दुकाने, हॉटेल, कृषी सेवा केंद्र, कापड विक्रे ते, जनरल स्टोअर्स, पानटपऱ्या, दूध विक्रेते यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले़ साखर, गूळ, चहा पावडर, साबण, तेल, दूध यांसारख्या व जीवनावश्यक व दररोजच्या वस्तू खरेदी करता न आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली़ काही दुकानदारांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या, परंतु ग्राहकांना त्या बदल्यात तितक्या किमतीच्या वस्तू खरेदी कराव्या लागल्या़ नारायणपूर : ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र आज पाहण्यास मिळाले. भाजीपाला बाजारपेठेत तर शेतकऱ्यांनी ५00 आणि हजार रुपयांच्या नोटा घेतल्या नाही. पिंपळे ( ता. पुरंदर) येथील शेतकरी तानाजी पोमण यांना एक पीयूसी पाईप शेतीच्या कामासाठी विकत घ्यायचा होता. किंमत ३00 रुपये होती, मात्र दुकानदार 500 रुपये घेत नव्हता. सुट्टे आणा सांगितले एक तास फिरूनही कोणीही सुट्टे पैसे दिले नाही. शेतात पाण्याची पाळी असल्याने पाईप घेणे गरजेचे होते, मात्र सुट्टे पैसे नसल्याने खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. नारायणपूर येथील दुकानदार भानुदास बोरकर यांनी सांगितले की आज सुटे पैसे कोणच बाहेर काढत नसल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. हे किती दिवस चाले हे सांगता येत नाही. आज धंदाच झाला नाही. लोणी काळभोर : आज सकाळपासूनच या परिसरांतील सर्वच पेट्रोलपंपांवर लोकांची झुंबड उडाली होती. तेथे ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येत होत्या, परंतु त्या रकमेपेक्षा कमी रकमेच्या इंधनाची मागणी करण्यात आली, तर मात्र सुट्या पैशांची मागणी करण्यात येत असल्याने लोकांना अडचणींना सामोरे जावे लागले. नाईलाजाने त्यांनी तेवढ्या रकमेचे इंधन भरणे पसंत केले. पुणे - सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाका येथेही या नोटा स्वीकारण्यात येत होत्या. येथे प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता बहुतांश वाहनचालकांच्या हातात पाचशे अथवा हजार रुपये किमतीची नोट दिसत होती. दौंड : शहर आणि परिसरात मंदीचे सावट होते. एटीएमवर पैसे भरताना लाईनीत उभे राहण्यावरुन देखील काहीठिकाणी गोंधळ झाला. बुधवारी बहुतांश ठिकाणी व्यवहारात वादंग झाले. विशेषत: भाजी मंडईतही परिस्थिती दिसून आली. दिवसभर व्यापारपेठेत शुकशुकाट होता.
आर्थिक व्यवहार ठप्प!
By admin | Published: November 10, 2016 2:03 AM