पुणे: सामान्य लोकांना २ ते ३ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून पॉग्जी स्किम चालवून त्याद्वारे १०० कोटींहून अधिक रक्कम गोळा करुन तो पैसा हवालाच्या माध्यमातून परदेशामध्ये पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सक्तअंमलबजावणी सचालयनालयाच्या वतीने सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे व इतरांना गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून सुरु होता. आरोपींनी व्ही आय पी एस ग्रुप ऑफ कंपनी व ग्लोबल अॅफिलेट बिजनेस या कंपनीच्या माध्यमातून लोकांना दरमहा २ ते ३ टक्के व्याजाने लोकांकडूनपैसे घेतले. त्या लोकांना कमिशनचे आमिष दाखवून फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली काना कॅपिटलमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी अनेक बनावट फर्म बनवून त्याचे ५ बोगस खात्यामध्ये पैसे भरायला लावले. लोकांना काही दिवस फॉरेक्स ट्रेडिंग करायला लावून त्यानंतर काना कॅपिटलचे संचलन बंद करुन तो पैसा हवालाच्या माध्यमातून भारताबाहेर पाठवून लोकांची १०० कोटी पेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.