तळेगाव दाभाडे : बँक आॅफ महाराष्ट्रमधील ‘चालक ते मालक’ योजनेतील घोटाळ्याच्या तपासणीसाठी आलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला सोमाटणे फाटा येथे डांबून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.उमेशचंद्र योगेंद्रदास गांधी (वय ३४, रा. वडाळा, मुंबई ईस्ट) असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. गुजरातमधील ‘चालक ते मालक’ योजनेअंतर्गत एका लॉजिस्टिक कंपनीला ६५८ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यामध्ये बँकेची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणी गुजरातमधील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. गांधी हे मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात कार्यरत आहेत. या घोटाळ्याप्रकरणी त्यांना १० एप्रिल रोजी सोमाटणे फाटा येथे जाऊन सिद्धिविनायक लॉजिस्टिक्सच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. गांधी दुपारी अडीचच्या सुमारास इमारिट्स हिल्स येथे आले होते. या सोसायटीतील सभासदांनी या ठिकाणी अशी कोणतीच मालमत्ता नसल्याचे सांगून त्यांना दुसऱ्या ठिकाणाचा पत्ता दिला. तेथे गांधी यांना मालमत्ता आढळली. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला असता त्यांना आतील एका पुरुषाने घरात येण्यास सांगितले. गांधी यांनी ईडीकडून आल्याचे सांगून मालमत्तेची कागदपत्रे मागितली. परंतु त्या इसमाने ‘तू खोटा अधिकारी आहेस’, असे सांगून त्यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. या इसमाने फोन करून आणखी तीन जणांना बोलावून घेतले. त्यांनीही गांधी यांना मारहाण केली. रात्री आठच्या सुमारास गांधी यांनी सुटका करुन घेत घडलेला प्रकार वरिष्ठांना सांगितला. त्यानंतर पाच जणांविरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमाटणे येथे प्रॉपर्टीच्या जागेवर भाड्याने राहणाऱ्या लोकांकडे विचारपूस केली असता, संबंधितांनी त्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.- मुकुंद पाटील, तळेगावचे पोलीस निरीक्षक
‘ईडी’च्या अधिकाऱ्यास डांबून केली मारहाण
By admin | Published: April 22, 2017 4:09 AM