Ed Raid: अजित पवारांना आणखी एक धक्का; मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 11:02 AM2021-10-28T11:02:13+5:302021-10-28T19:07:12+5:30
जगदीश कदम हे पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स या खाजगी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत
पुणे: अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीने छापा टाकला आहे. जगदीश कदम हे पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स या खाजगी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्याचबरोबर जलसंपदा खात्यांमधील काही कंत्राटांचाही त्यांच्याशी संबंध आहे. पुण्यातील सिंध कॉलनीतील घरी ईडीने छापा टाकून कारवाई सुरु केली.
या वसाहतीत सकाळीच पोलिसांच्या गाड्या आल्या असे सुरक्षा रक्षकाने सांगितले. लष्करी गणवेशात असलेला हत्यारी पोलीस बंदोबस्त पथकासमवेत होता. त्यांना खालीच थांबवून वसाहतीमधील ५३६ क्रमाकांच्या बंगल्यात हे पथक गेले. त्यानंतर सोसायमधील व या बंगल्यामधील प्रवेश थांबवण्यात आला. वसाहतीत राहणाऱ्यांनाही नाव पत्ता लिहूनच आत सोडले जात होते. बाहेरच्या बंदोबस्तामुळे लगेचच चर्चा सुरू झाली. त्यात दौंड शुगर, अजित पवार हीच नावे केंद्रस्थानी होती.
पथकातील सर्व अधिकारी मुंबईतील होते. त्यांच्याकडून कसलीही माहिती दिली जात नाही. स्थानिक पोलिसांनाही छाप्याची कल्पना दिली जात नाही. त्यांना गरज वाटली तरच फक्त बंदोबस्त म्हणून बरोबर घेतले जाते. कदम यांच्या घरात गेलेले पथक दिवसभर व सायंकाळीही तिथेच होते. त्यांच्याबरोबर संपर्क होऊ शकला नाही.
दौंडच्या साखर कारखान्यावर ७ ऑक्टोबरला आयकर विभागाने टाकला होता छापा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर या खासगी साखर कारखान्यावर आयकर विभागाने ७ ऑक्टोबरला सकाळी सहा वाजता छापे मारी केली होती. सुमारे 14 वर्षांपूर्वी दौंड सहकारी हा दौंड तालुक्यातील आलेगावमधील साखर कारखाना विकत घेत त्याचे खासगीकरण करण्यात आले आहे. अजित पवार यांचे नातलग असलेले नगर जिल्ह्यातील जगदीश कदम कारखान्याचे अध्यक्ष आहेत. माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व मुंबईतील बडे प्रस्थ असलेले विवेक जाधव हे या कारखान्याचे संचालक आहेत.