पुणे: शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकऱणी ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी केली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पुण्यात कोथरुड येथे राहणाऱ्या विभास साठे यांच्या घरांवर ईडीने छापा टाकला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित विभास साठे यांच्या पुण्यातील दोन घरांवर गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकांनी छापे घातले. अनिल परब यांनी दापोलीतील रिसोर्टची जागा विभास साठे यांच्याकडून विकत घेतली होती. हा व्यवहार २०१७ मध्ये झाला होता. विभास साठे यांनी जागा विकली. त्यावेळी तेथे रिसोर्ट नव्हता. या व्यवहारात साठे यांना ब्लॅक मनी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
ईडीचे पथक आज सकाळी ८ वाजता पुण्यातील कोथरुड येथील सिटी प्राईड समोर असलेल्या दी पॅलेडियम इमारतीत आले. तेथे २० व्या मजल्यावर विभास साठे यांचे घर आहे. तेथे ते स्वत: राहतात. ईडीचे पथक दुपारपर्यंत तेथे होते. तसेच त्यांचे दुसरे घर वनाज कंपनीसमोरील इंद्रधनू सोसायटीत आहे. हे घर त्यांनी भाड्याने दिले आहे.
या प्रकरणी भाजपाने सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनिल परबांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. २५ कोटी रिसोर्ट बांधले. त्या बांधकामाचा खर्च कोणी केला? सचिन वाझेकडून १०० कोटी वसुली येत होती त्यातही अनिल परब यांचे नाव होते. उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांनी माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या नावानं बोगस एफआयआर करण्यात आला. पोलिसांना कुणाचा फोन येत होता? अनिल परबांनी बॅग भरायला घ्यावी. अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे राइट हँण्ड आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.